ठाणेकरांनी अनुभवली ‘त्यांच्या लेखणीतील ती’

* शिवरंजनी`च्या कार्यक्रमाला `हाऊसफुल्ल प्रतिसाद;
* आर्या आंबेकरने जिंकली रसिकांची मने

ठाणे : काव्य, नृत्य, गाणी, सन्मान, मुलाखत या माध्यमातून स्त्री पर्वाचा जागर करीत ‘शिवरंजनी एन्टरटेन्मेंट्स`च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या `त्यांच्या लेखणीतील ती’ या कार्यक्रमाला ठाण्यात भरभरून प्रतिसाद मिळाला.

प्रसिद्ध पार्श्वगायिका आर्या आंबेकरच्या साथीने रंगलेली संगीत मैफल ठाणेकरांना मंत्रमुग्ध करून गेली. ठाणेकरांनी कार्यक्रमाला हाऊसफुल्ल प्रतिसाद दिला.

जागतिक महिला दिनानिमित्त ठाण्यातील ‘शिवरंजनी एन्टरटेन्मेंट्स`च्या वतीने हा कार्यक्रम ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची निर्मिती आणि संकल्पना रवी नवले यांची होती. मराठी कविता, गाणी यामध्ये स्त्रीचे प्रतिबिंब कसे उमटले आहे, तिचे कौतुक, तिचे मोठेपण, तिचे अस्तित्त्व आपल्या मायमराठीतल्या दिग्गज साहित्यिकांनी त्यांच्या लेखणीतून कसे शब्दबद्ध केले आणि तिची महती कशी सांगितली आहे, याची प्रचिती `त्यांच्या लेखणीतील ती..’ या कार्यक्रमातून आली. कवी ग्रेस, भा. रा. तांबे, सुरेश भट, सुधीर मोघे, शांताराम नांदगावकर, जगदीश खेबूडकर, गुरू ठाकूर, अशोक परांजपे अशा दिग्गज कवींच्या लेखणीतून अवतरलेली ती या कार्यक्रमानिमित्त ठाणेकरांना अनुभवता आली.

गाणं हे माझं पॅशन
गाणं आणि अभिनय यातलं अधिक प्रिय काय असं विचारल्यावर आर्या आंबेकर हिने क्षणाचाही विलंब न करता गाण्याची निवड केली. गाणं हे माझ्यासाठी पॅशन आहे, असे सांगत तिने संगीतावर शिक्कामोर्तब केले. आर्याच्या छोटेखानी मुलाखतीनंही कार्यक्रमात रंगत आणली.

शीर्षक गीतं आणि आर्या आंबेकर
ज्या मंचावर आर्या गाण्यासाठी उभी राहते, तिथे आवर्जून तिने गायलेल्या मालिकांच्या शीर्षकगीतांची फर्माईश होतेच. ‘शिवरंजनी`च्या कार्यक्रमातही तिनं `माझा होशील ना आणि तुला पाहते रे’ या मालिकांची शीर्षकगीतं सादर केली. कितीदा नव्याने तुला आठवावे या गीताने सुरुवात करून आर्याने केवड्याचं पान तू, भाग्यदा लक्ष्मी आणि बाई गं ही गीतं सादर केली.

`वन्स मोअर`चा भरभरून प्रतिसाद
‘त्यांच्या लेखणीतील ती’ या कार्यक्रमात सादर झालेल्या अनेक गाण्यांना रसिकांनी भरभरून वन्समोअरचा प्रतिसाद दिला. ती गेली तेव्हा, मालवून टाक, तुला पाहिले मी, येऊ कशी प्रिया, बाई गं या गीतांना रसिकांनी वन्समोअरचा प्रतिसाद दिला. गगन सदन या गीतावर मंजिरी वाठारे यांनी नृत्य सादर केले. मानसीचा चित्रकार, केव्हा तरी पहाटे, सुन्या सुन्या मैफलीत, त्याची धून झंकारली, राधा ही बावरी, येऊ कशी प्रिया, जीव रंगला, तुम्हावर केली, जाळीमंदी पिकली करवंद, डिपाडी डिपांग अशा सगळ्या गीतांमधून उलगडेल्या तिच्या अस्तित्त्वाचा सन्मान करत रसिकांनी भरभरून दाद दिली आणि कलाकारांचे कौतुक केले.

आम्ही धरित्रीच्या लेकी
महिला दिनाचं औचित्य साधून ‘शिवरंजनी`च्या वतीने स्त्री शक्तीचा सन्मान आणि स्त्री पर्वाची जाणीव म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो. यंदा सन्मानाचं हे तिसरं वर्ष होतं. संस्थेच्या वतीने यंदा डॉ. अर्चना देशपांडे-कृष्णन (शास्त्रज्ञ), प्रिया प्रभुदेसाई (उद्योजिका) आणि गाथा जाधव-आयगोळे (गजलकारा) यांना गौरविण्यात आलं. `आम्ही अशाच असतो; कणखर नि झुंजार, तलवारीला मिळाले जणू मन हळुवार, विना आमच्या ठरेल सारे सृजन एकाकी; होय! अशाच आहोत आम्ही धरित्रीच्या लेकी!! या शब्दांत गाथा यांनी पुरस्कारानंतर त्यांची भावना व्यक्त केली. तसेच त्यांनी स्वरचित गजलही यावेळी सादर केली.

शिवरंजनीचे संस्थापक प्रकाश नवले, उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई, मिलिंद ठेकेदार, उद्योजिका नंदिनी सुर्वे, बासरीवादक पं. विवेक सोनार, संगीतकार मीनल मंडलिक आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.

प्रसिद्ध गायिका अनघा पेंडसे, गायक मनोज देसाई, केतकी भावे-जोशी, पार्श्वगायक ऋषिकेश रानडे यांचा कार्यक्रमात सहभाग होता. अभिनेता विघ्नेश जोशी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. कार्यक्रमात रवी नवले (तबला), मनिष ठुंबरे (ढोलक), अभिजित पाटील, साईराज नवले (तालवाद्य), सचिन नाखवा (ऑक्टोपॅड), विनय चेऊलकर आणि प्रशांत लळीत (की-बोर्ड), विजय तांबे (बासरी), संजय महाडिक (गिटार) यांनी साथ केली. जाई काजळ आणि एमकेई इंजिनिअर्स हे कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते.

शिवरंजनी ही संस्था गेली २५ वर्षे ठाण्यात प्रयोगशील, शिस्तबद्ध आणि देखण्या आयोजनासाठी प्रसिद्ध आहे. प्रकाश नवले यांनी १९९८ मध्ये या संस्थेची स्थापना केली आणि आज शिवरंजनी एन्टरटेन्मेंट या नावाने रवी नवले अतिशय नेटाने संस्थेचा पुढील कारभार पहात आहेत. आजवर भारतातील अनेक प्रयोगशील आणि दिग्गज कलावंतांनी शिवरंजनीच्या मंचावर आपली कला सादर केली आहे. शिवरंजनी हे नाव जेव्हा कोणत्याही संगीत महोत्सव, कला महोत्सव किंवा संगीत मैफलीला जोडले जाते तेव्हा कलारसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याशिवाय राहत नाही.

शिवरंजनीच्या आतापर्यंतच्या प्रवासात ‘ठाणेवैभव`चे मोलाचे सहकार्य असल्याची भावना कार्यक्रमाचे निर्माते रवी नवले यांनी ठाणेवैभव`शी बोलताना व्यक्त केली.ते म्हणाले,`ठाणेवैभव`चे संपादक मिलिंद बल्लाळ यांच्याकडून नेहमीच सहकार्य आणि मार्गदर्शन मिळत आले आहे. ठाण्यातील साहित्य, नाट्य आणि कलांच्या संवर्धनात श्री. बल्लाळ यांचा मोलाचा वाटा आहे. प्रत्येक कलाकाराच्या पाठिशी ते खंबीरपणे उभे असतात. त्यामुळे आम्हा कलाकारांना विविध प्रयोग करण्यासाठी बळ मिळते.

‘धरित्रीच्या लेकीं`विषयी गाथा जाधव-आयगोळे (गजलकारा) : गाथा यांची ओळख म्हणजे भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय योग गीताच्या त्या गायिका आहेत. नेचर के बंदे हा त्यांचा स्वतःचा सूफी रॉक बँड आहे. सध्या मुंबई विद्यापीठातून मराठी आणि ऊर्दू गजलच्या तौलनिक अभ्यासावर त्या संशोधन करत आहेत. गजलगुंजन तसेच गजलसम्राट सुरेश भट या विशेष सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले आहे.

अर्चना देशपांडे – कृष्णन् (शास्त्रज्ञ) : बायोजिनोमिक्स लिमिटेड कंपनीच्या सहसंस्थापक आणि संचालक म्हणजे अर्चना कृष्णन्. संसर्गजन्य रोगांचे निदान करण्यासाठी शासनाकडून जी धोरणं आखली जातात त्यासाठी मुख्य सल्लागार म्हणून त्या काम पाहतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत त्यांचे २० पेक्षा अधिक प्रबंध प्रकाशित झाले आहेत. भारतासह अमेरिका आणि युरोपमध्ये त्यांच्या नावावर आतापर्यंत ३५ पेटंट आहेत.

प्रिया प्रभुदेसाई (उद्योजिका) : जाहिरातीच्या माध्यमातून पितांबरीची उत्पादने भारतभरात सगळ्यांपर्यंत पोहोचतात ती प्रिया प्रभुदेसाई यांच्यामुळे. त्या पितांबरीच्या एजीएम आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाखाली राज्याबाहेर पितांबरीचे विविध उपक्रम यशस्वीपणे सुरू आहेत. तसेच सांस्कृतिक आणि विविध सामाजिक उपक्रमातून त्या पितांबरीला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवतात. याखेरीज त्यांनी नृत्याचा छंद जोपासला असून भरतनाट्यममध्ये उपांत्य विशारद आहेत.