१३ पदकांची लयलूट
ठाणे : सुमारे २ वर्षांनी होते असलेल्या पहील्या सिनियर राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन नांदेड येथे करण्यात आले होते आणि यात ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंनी सर्वच गटांत एकूण १३ पदके जिंकण्याची किमया साधली आहे.
ठाणेकर खेळाडूंनी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासूनच दमदार खेळाचे सादरीकरण करून अजिंक्यपदाची दावेदारी सिद्ध केली होती. त्यातसुद्धा दुहेरीत सर्वच गटांत पदके मिळवून ठाणेकर बॅडमिंटनपटूंनी दबदबा कायम ठेवला आहे. पुरुष दुहेरीमध्ये ठाणेकर विराज कुवळे व विप्लव कुवळे यांनी स्पर्धेत सुरुवतीचे सामने एक हाती जिंकत आपले अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. उप-उपांत्य फेरीत वरद गजभिये आणि विनीत कांबळे या जोडीचा त्यांनी २१-१३,२१-१८ असा पराभव केला. तर उपांत्य फेरीत त्यांचा सामना ठाण्याच्याच दीप रांभिया आणि अक्षन शेट्टी सोबत झाला. या अटीतटीच्या सामन्यात विराज आणि विप्लव यांनी त्यांचा २१-८,१४-२१,२२-२० असा पराभव केला व अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत त्यांचा सामना ठाणेकर जोडी प्रतिक रानडे आणि शुभम पाटील यांच्या सोबत होता. या जोडीचा त्यांनी २१-१७,२१-१६ असा पराभव केला व अजिंक्यपदक प्राप्त केले.
प्रतिक आणि शुभमने उपांत्य फेरीत ठाण्याच्याच अभ्युदय चौधरी आणि तेजस खोमणे या जोडीचा २१-१६,२१-१३ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. आपल्या पहील्या वहिल्या सिनियर राज्यस्तरीय स्पर्धेत अभ्युदय चौधरी याने पुरुष दुहेरीत कांस्य आणि मिश्र दुहेरीत देखील कांस्य पदक मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचप्रमाणे महिला दुहेरीत देखील ठाणेकर अनघा करंदीकर हिने योगिता साळवेला साथीला घेत उपांत्य फेरीत द्वितीय सीडेड निकिता जोसेफ व सोनाली मिरखेलकर यांचा २१-१३, २१-१४ असा पराभव केला. परंतु त्यांना अंतिम सामन्यात हार पत्करावी लागली. तसेच तिने मिश्र दुहेरीत अभ्युदय चौधरी ह्याला साथीला घेत उप-उपांत्य फेरीत शशांक आणि अनन्या या जोडीला २१-१६,२१-११ असं नमवून कांस्य पदक प्राप्त केले. तरीही अनघा करंदीकर हिने आपली यशस्वी धुरा ह्या स्पर्धेत १ रौप्य पदक आणि १ कांस्य पदक मिळवून कायम ठेवली आहे. मिश्र दुहेरीच्या उप उपांत्य फेरीत ठाणेकर शुभम पाटील आणि मानसी कारेकर यांनी देखील ठाणेकर प्रथमेश कुलकर्णी आणि सोनाली मिरखेळकर यांचा २३-२१, १०-२१, १३-२१ असा पराभव केला परंतु उपांत्य फेरीत त्यांना पराभव पत्करावा लागला. अतिशय मानाच्या अशा मिश्र दुहेरीच्या गटांत आपले प्रभुत्व पुन्हा एकदा सिद्ध करीत अक्षया वारंग आणि प्रतिक रानडे या जोडीने अजिंक्यपद पटकावण्याचा मान मिळवला. उप उपांत्य फेरीत त्यांनी हकिमोद्दिन अन्सारी आणि योगिता साळवे यांचा २१-१३, २१-१६ असा एक हाती पराभव केला. पुढे उपांत्य फेरीत त्यांनी ठाणेकर जोडी मानसी कारेकर आणि शुभम पाटील यांचा २१-१४, २१-१२ असा पराभव केला. तर अंतिम फेरीत त्यांनी सेकंड सीडेड अक्षन शेट्टी आणि सिमरन सिंघीचा २१-१६, १९-२१, २२-२० असा पराभव करून अजिंक्यपद प्राप्त केले.
सदर विजयात ठाणे अकादमीचे सर्व प्रशिक्षक आणि तसेच दुहेरी विशेष प्रशिक्षक व माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू अक्षय देवलकर यांचा सिंहाचा वाटा आहे असे सर्वांनी नमूद केले. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक करीत श्रीकांत वाड, क्रीडा अधिकारी श्रीमती मिनल पालांडे आणि ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या संपूर्ण टीमने त्यांना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
सुवर्णपदक : प्रतिक रानडे, अक्षया वारंग, विराज कुवळे व विप्लव कुवळे.
रौप्य पदक : अनघा करंदीकर, प्रतिक रानडे, शुभम पाटील.
कांस्य पदक : अभ्युदय चौधरी, अनघा करंदीकर, शुभम पाटील, मानसी कारेकर, तेजस खोमणे, दीप रांभिया