ठाणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या निकालात ठाण्यातील दोन तरुणींनी आपले परिश्रम आणि जिद्द सिद्ध केली आहे. ऐश्वर्या सुर्वे आणि स्नेहल चव्हाण अशी या तरुणींची नावे आहेत. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर झालेल्या निकालात ऐश्वर्या यांना मुलींमधून ४४ वा आणि एकूण ४१० वा क्रमांक मिळाला आहे, तर स्नेहल यांना मुलींमधून ५८ वा आणि एकूण ४८० वा क्रमांक मिळाला आहे.
शास्त्रीनगरमधील ऐश्वर्या सुर्वे सध्या मंत्रालयात द्वितीय श्रेणी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नोकरी आणि अभ्यास यांचा समतोल राखत त्यांनी दररोज १० ते १२ तास अभ्यास केला. २०२० पासून त्या एमपीएससीसाठी प्रयत्न करत होत्या. आणि चौथ्या प्रयत्नात अखेर त्यांना यश मिळाले. वडिलांच्या निधनानंतर आईसोबत घर सांभाळत ऐश्वर्या यांनी हा प्रवास पार केला. २४ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांची मुलाखत झाली. राज्य कर सहाय्यक आयुक्त म्हणून काम करण्याचे त्यांचे स्वप्न आहे.
पारसिक नगर, कळवा येथील स्नेहल चव्हाण सध्या पालघर येथे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा हा तिसरा प्रयत्न असून यावेळी त्यांनी उत्तम यश मिळवले. मेन्सच्या काळात त्या दररोज १२ ते १३ तास अभ्यास करत. पुढील लक्ष्य डीवायएसपी पद असल्याचे त्यांनी सांगितले. ऐश्वर्या सुर्वे आणि स्नेहल चव्हाण या सी. डी. देशमुख वाचनालयाच्या विद्यार्थिनी असून त्या ठिकाणच्या वातावरणाचा त्यांच्या यशात मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. ऐश्वर्या आणि स्नेहल यांच्या यशकथांनी राज्यातील अनेक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा दिली आहे.