प्रयत्न आमचे, श्रेय मात्र उपटतायत भलतेच – नजीब मुल्ला

स्वा. हकीम अजमल खान रुग्णालयातील सुधारणा प्रकरण

ठाणे: कौसा येथील स्वा. हकीम अजमल खान रुग्णालयातील प्रसूती गृह अद्ययावत होण्याबाबत आणि इतर सुधारणांबाबत मी स्वतः ठाणे महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला असून त्यामुळेच या प्रसूतिगृहात रुग्णाशय्या वाढविण्यात आल्या आहेत. मात्र याचे श्रेय भलतेच घेत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष, माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केली आहे.

कौसा येथील स्वा. हकीम अजमल खान रुग्णालयातील प्रसूती गृहात रुग्णशय्या वाढवण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला. मी स्वतः रुग्णालय आणि प्रसूतीगृहाच्या सुधारणा याबाबत पाठपुरावा केला आहे. मात्र त्याचे श्रेय भलतेच उपटत असल्याचे प्रकाशित झालेल्या बातम्यांमधून दिसत आहे, असे राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आणि माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी पत्रात म्हटले आहे.

श्री.मुल्ला यांनी दिलेल्या पत्रानुसार त्यांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तांकडे या सुधारणांबाबत निवेदन दिले असून त्याबाबत वारंवार पाठपुरावा केला आहे. कौसा येथील स्वा. हकीम अजमल खान रुग्णालयाला वारंवार महापालिकेने निधी दिला आहे मात्र येथे वारंवार गळती होत आहे. मुख्य अभ्यागत कक्षात वेंटिलेशनची व्यवस्था नाही. प्रसूतिगृहात सोनोग्राफी सुविधा काही वेळेपुरतीच असते, ती दिवसरात्र सुरू ठेवावी. येथे आवश्यक डॉक्टर आणि परिचारिकांची तातडीने भरती करावी. कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेली एनआयसीयु यंत्रणा धूळ खात पडून आहे, ही युनिट तातडीने सुरू करण्यात यावेत. या रुग्णालयात १५ डायलिसिस यंत्रांची तरतूद असताना केवळ १० यंत्रे उपलब्ध झाली असून उर्वरित पाच यंत्रे तातडीने उपलब्ध करण्याची मागणीही श्री.मुल्ला यांनी पत्राद्वारे केली होती.

या रुग्णालयात सुधारणा केल्यास मुंब्रा, कौसा, शीळ, दिवा आदी भागातील हजारो नागरिकांना त्याचा फायदा होणार असून शासनाकडून मदत हवी असल्यास त्यासाठी प्रयत्न करू, असेही श्री.मुल्ला यांनी आयुक्तांना सांगितले होते. त्यानुसार श्री.मुल्ला यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणून या रुग्णालयातील प्रसूतीगृहातील रुग्णशय्या वाढविण्यात आल्या. मात्र त्याचे श्रेय भलतेच उपटत असल्याचे श्री.मुल्ला यांचे म्हणणे असून ते हास्यास्पद असल्याची टीकाही श्री.मुल्ला यांनी केली आहे.