ठाणे/आनंद कांबळे:
ठाणे महापालिका प्रशासनाने अखेर पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला असून मुंबई महापालिका प्रमाणे या वर्षाची बिले सामान्य कर माफ करून करदात्यांना देण्यात येणार आहेत.
मागील निवडणुकीच्या वचननाम्यात शिवसेनेने ५००चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचे वचन दिले होते. मागील पाच वर्षांपासून राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपा मालमत्ता कर माफ करण्याची मागणी करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी पहिल्यांदा मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव महासभेत मांडला होता. महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत संपण्यापूर्वी शिवसेनेचे राम रेपाळे यांनी सभागृहात 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा आयत्यावेळीचा ठराव मांडला होता. त्याला तत्कालीन महापौर नरेश म्हस्के यांनी मंजुरी दिली होती. राज्य सरकारने या ठरावाला मंजुरी दिली होती, परंतु महापालिकेने त्याबाबत निर्णय घ्यावा, अशी सूचना केली होती.
महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी अखेर 500 चौरस फूट घरांना मुंबईप्रमाणे करमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार फक्त ३१ टक्के सामान्य कर माफ केला जाणार आहे. सरसकट घरपट्टी माफ करण्यात आलेली नाही. करदात्यांना जल लाभ कर, अग्निशमन कर, वृक्ष कर, रस्ता कर, साफसफाई कर आदी कर द्यावे लागणार असून हे कर समाविष्ट करून मालमत्ता कारांची देयके ठाणेकरांना दिली जाणार आहेत. या निर्णयामुळे ठाणे महापालिका केला सुमारे ७६ कोटींचा फटका बसणार आहे.
ठाणे महापालिका हद्दीत सुमारे तीन लाख मालमत्ताधारक आहेत. त्यामधील पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांनाच सामान्य कर माफ केला जाणार आहे.
ठाणे शहरातील झोपडपट्टी, चाळ, यांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे तसेच इमारतीमधील वन बीएचके सदनिकांना याचा फायदा होणार आहे, असे महापालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.
महापालिका कायद्यात सरसकट घरपट्टी माफ करण्याची तरतूद नाही, त्यामुळे फक्त सामान्य कर माफ करण्यात आला असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले.