पॅरिस-टोकियोच्या रांगेत मिळणार ठाण्याला स्थान!

गायमुखजवळ उभारणार १६० मिटर उंचीचा व्ह्युईंग टॉवर ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यात मिळाले स्थान

आनंद कांबळे/ठाणे

तलावांचे शहर म्हणून ओळख असलेले ठाणे भविष्यात देशातील सर्वात उंच अशा व्ह्युईंग टॉवरमुळे ओळखले जाणार आहे. सिंगापूर आणि मलेशिया या देशातील उंच टॉवरची जगभरात ओळख निर्माण झाली आहे. तशीच ओळख ठाण्याची होणार असून देशाबरोबरच परदेशातील पर्यटकांचा ओढा ठाण्याकडे वाढू लागण्याची शक्यता आहे.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने आराखड्यात या व्ह्युईंग टॉवरचा प्रस्ताव मांडला आहे. कासारवडवली, गायमुखजवळ हा टॉवर उभारण्यात येणार आहे. या टॉवरच्या उंचीवरून एका बाजूला सुंदर खाडीचे दृश्य, दुसरीकडे निसर्गाने नटलेल्या येऊरच्या जंगलासह ठाण्याच्या सौंदर्याचे दर्शन घडणार आहे. विशेष म्हणजे या व्ह्युईंग टॉवरखालून कोस्टल रोड जाणार असून इतर प्रमुख रस्तेही जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे केवळ राज्यातून, देशातून नव्हे तर जगभरातून पर्यटक ठाण्यात हा टॉवर पाहण्यासाठी येतील आणि पर्यटनासह रोजगाराला बळकटी मिळेल असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.

जगभरात सध्या उंच टॉवरची स्पर्धा सुरू झाली आहे. यामध्ये जपान टोकिओ येथील स्कायट्री हे सर्वात उंच ६३५ मीटर उंचीचे टॉवर आहे. त्या खालोखाल चीन येथील ६०० मीटर उंचीचे कॉनटॉन टॉवर आहे. मलेशिया येथिल ट्वीन टॉवर, कॅनडाचे जीएन टॉवर, उजबेकिस्तानचे टस्किन टॉवर, पॅरिसचे आयफेल टॉवर, तसेच सिंगापूर आणि दुबई येथिल टॉवर पाहिल्याशिवाय विश्वभ्रमंती आणि पर्यटन अपुरे समजले जाते. हे टॉवर त्या-त्या देशाची ओळख बनले आहेत. भारतातही दिल्ली येथे लोटस टॉवर आहे. त्याची उंची ३५ मीटर इतकी आहे. तर गुजरात राज्यात स्टॅच्यू ऑफ युनीटी हे सरदार वल्लभभाई पटेल यांची साकारलेली १८२ मीटर उंचीची प्रतिकृती आहे. ही प्रतिकृती पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक गुजरातला येतात. त्यामुळे पर्यटनाच्या त्याच धर्तीवर पण जगाशी स्पर्धा करणारा व्ह्युईंग टॉवर उभारण्याचा मानस ठाणे महापालिकेने सोडला आहे. पुढील २० वर्षातील शहराचा सुधारित आराखडा तयार करताना या टॉवरला पालिकेने मानाचे स्थान दिले आहे.

ठाणे हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. ऐतिहासिक वारसा या ठाण्याला आहेच पण विकासाच्या दृष्टीनेही अनेक नवीन पॅटर्न हे ठाण्यातून देशभरात पोहचले आहेत. येत्या काळात ठाण्याचा विकास झपाट्याने होईल या वेगाने पाऊले उचलली जात आहेत. सीबीडी म्हणजे सेंट्रल बिझनेस डिस्ट्रीक्ट कोस्टल अर्बन फॉरेस्ट, मेंग्रोज वन, डिजिटल युनिव्हर्सिटी, वॉटर फ्रंट अशी अनेक विकास कामे त्यातून होणार आहेत. यामध्ये व्ह्युईंग टॉवर मोलाची भर टाकेल असा विश्वास ठाणे महापालिकेला आहे.

प्रख्यात वास्तूविशारद हाफीज कॉन्ट्रॅक्टर यांनी या व्ह्युईंग टॉवरचे डिझाईन तयार केले आहे. या टॉवरमध्ये इमारती असतीलच पण मुख्य आकर्षण हे चार इमारतींना जोडणारे शिरोमणी ठरणार आहे. त्यामुळे भविष्यात जपान, पॅरिस, चीनमध्ये जसे टॉवर पाहण्यासाठी पर्यटक जातात, तसेच भारतात येणारे पर्यटक ठाण्यातील व्ह्युईंग टॉवर पाहण्यासाठी येतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हा प्रकल्प मार्गी लागला तर तमाम ठाणेकरांसाठी ही मान उंचावणारी बाब असणार आहे.

पालिकेने सुधारित विकास आराखड्यात प्रस्तावित केलेले व्ह्युईंग टॉवर कासारवडवली, गायमुखजवळ असेल. कोस्टल रोडच्या जंक्शनला लागून हा १६० मीटर उंचीचा आणि ९१.१४ मीटर रुंदीचा टॉवर असणार आहे.

राणीच्या मुकुटाचा आकार असलेल्या हा टॉवर चार भागाने जोडला जाणार आहे. तर वर अंडाकृती शिरोमणी असणार आहे. या शिरोमणी आकाराच्या इमारतीमधून संपूर्ण ठाणेच नव्हे तर वसई, पालघरचा काही भागही पाहता येणार आहे. तर खालून कोस्टल रोड जाणार आहे. भारतातील हे सर्वात उंच व्ह्युईंग टॉवर ठरेल, असा दावा पालिकेने केला आहे.