ठाण्याचे वृक्षप्रधिकरण बिल्डरधार्जिणे

आमदार संजय केळकर यांचा आरोप

ठाणे: ठाणे शहरातील वृक्ष प्राधिकरण मनमानी पद्धतीने काम करत असून मान्यतेपेक्षा अधिक झाडे तोडली जात आहेत. बिल्डरधार्जिणे असल्याप्रमाणे हे प्राधिकरण काम करत असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केला.

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी वृक्ष प्राधिकरणासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधीवर आ.केळकर बोलत होते. ठाणे शहरातील वृक्ष प्राधिकरण हे वादग्रस्त असून मनमानी कारभार सुरू आहे. मान्यतेपेक्षा अधिक वृक्षतोड करून बिल्डरधार्जिणी भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोवीड काळापासून मागील तीन वर्षात वृक्ष प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याची मागणी श्री. केळकर यांनी केली.

२०१७ साली ठाण्यात झाड पडून पतीचा मृत्यू झालेल्या प्रीती पवार यांना ठाणे महापालिकेने अनुकंपा तत्वावर कंत्राटी स्वरूपात नोकरी दिली आहे. त्यांना कायमस्वरुपी नोकरी मिळावी यासाठी राज्य शासन निर्णय घेणार आहे का असा प्रश्न उपस्थित करत अशा प्रकरणांत ठोस धोरण तयार करण्याची मागणी श्री.केळकर यांनी केली आहे.

गृह संकुलात असलेल्या झाडांच्या फांद्यांवर छाटणी करायची झाल्यास गृहसंकुलांना शुल्क आकारण्यात येते. हे शुल्क आकारण्यात येऊ नये यासाठी प्रशासन सकारात्मक असून त्याची अमल बजावणी करण्याची गरजही श्री. केळकर यांनी व्यक्त केली.

नागरिकांना त्रासदायक ठरणारे दुभाजक बसवणार नाहीत

ठाण्यात महापालिकेकडून रस्त्यांत दुभाजक बसवण्यात येत आहेत. नागरिकांना त्रासदायक ठरतील असे दुभाजक बसवण्यात येणार नसून प्रशासनाची मनमानी होणार नाही असे आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले आहे. याबाबतची अमलबजावणी व्हावी, अशी मागणी आ.केळकर यांनी केली.