ठाणे : ठाणे परिवहन सेवा आणि ठाणेकर प्रवासी यांच्या हितासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रशासनाने ऑनलाईन मोबाईल तिकीट ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ॲपला सोयीचे आणि आकर्षक नाव सुचवण्याचे आवाहन परिवहन प्रशासनाने केले आहे.
सुट्टे पैसे आणि तिकिटावरून बस वाहक आणि प्रवासी यांच्यात नेहमीच खटके उडत असतात. त्याचबरोबर कागदी तिकिटांमुळे पर्यावरणाचाही ऱ्हास होतो. त्यामुळे परिवहन प्रशासनाने ऑनलाईन तिकिटे देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बसमध्ये चढण्याआधी तिकीट आरक्षित करता येणार असून सुट्ट्या पैशांची समस्याही निकाली निघणार आहे. परिणामी वाहक आणि प्रवासी यांच्यात खटके उडणार नाहीत. त्यांचा वेळही वाचेल. विशेष म्हणजे कागदी तिकिटांचा वापर बंद होऊन झाडांची कत्तल थांबणार आहे. साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक पाससह इतर सुविधाही प्रवाशांना सहज मिळणार आहेत.
या ॲपसाठी योग्य आणि उच्चारासाठी सोपे, आकर्षक असे नाव सूचवण्याचे आवाहन परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांना केले आहे.