ठाणे आरटीओने जारी केले दीड हजार आंतरराष्ट्रीय वाहन परवाने

११ महिन्यात ठाणेकरांचा परदेशी जाण्याचा मार्ग मोकळा

ठाणे : जगातील काही देशांतील नोकरीच्या आकर्षणामुळे, नोकरी /व्यवसायानिमित्त जाणा-या  भारतीय युवकांचे आणि नागरिकांचे प्रमाण वाढत आहे. गेल्या ११ महिन्यात ठाणे आरटीओच्या अधिका-यांनी १५०० खास आंतरराष्ट्रीय वाहन परवाने जारी केले आहेत. या परवान्यांची मुदत एक वर्षांचीच आहे, अशी माहिती आरटीओच्या ठाणे कार्यालयाचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक खेनट यांनी दिली.

गेल्यावर्षी  ‘आरटीओ’च्या ठाणे कार्यालयाकडून फक्त  ५५५  नागरिकांनी आंतरराष्ट्रीय परवाना काढला होता. परंतु यावर्षी ही संख्या वाढली आहे. करोनाच्या काळात सर्व शासकीय यंत्रणा कार्यरत नव्हत्या. परदेशात जाण्याचे नाव घेणेही सोडा, अशी अवस्था जगात होती. ठाण्यातील करोना हद्दपार झाला असतानाच परदेशातीलही सर्वच व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. परदेशातील नोकरी व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्याने भारतीय विद्यार्थी, युवक, नोकरदार असे अनेक इच्छुकांच्या आकांक्षा जाग्या झाल्या आहेत.

भारतातील, ठाण्यातील उच्चशिक्षित अनेक तरुणांचा ओढा मुख्यत्वे अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, सौदी अरब या देशांकडेच आहे. या देशांत जाऊन अतिमेहनत करुन गलेलठ्ठ पगाराची नोकरीची संधी मिळत असल्याचे स्वप्न साकार येथेच होते.  भारतात, ठाण्यात स्वत:चे वाहन चालवता येत असल्यामुळे या तीन वा इतर अवाढव्य देशांमध्ये स्वत:ला वाहन चालवता येईल, अशा आत्मविश्वासामुळे ठाणे आरटीओंच्या अधिका-यांना भेटून याबाबत माहिती  मिळवली. परंतु, विदेशात वाहन चालक परवाना मिळणे अशक्य असल्याने अनेकांनी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून जारी करण्यात  येणारा आंतरराष्ट्रीय परवाना काढला आहे.

यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यात १५०० नागरिकांनी आंतरराष्ट्रीय परवाना घेतले असल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक खेनट यांनी ‘ठाणेवैभव’ला दिली. हा परवाना काढून परदेशात वाहन चालविण्याचा संबंधितांचा मार्ग मोकळा झाला आहे.
परदेशात वाहन चालविण्याचे नियम काटेकोरपणे पाळले जातात. वाहन चालवायचे झाल्यास चालकासोबत चालक परवाना असणे सक्तीचे आहे.

भारतातून नोकरी व्यवसाय आदीसाठी काही देशांत जाणा-या नागरिकांना खास आंतरराष्ट्रीय परवाना दिला जातो. ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे, त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून, नंतर कागदपत्रांची पडताळणी आदी सुविहित पद्धत पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे, असे अधिका-यांनी सांगितले.

भारतीय महिलाही परदेशात वाहन हाकतात. गेल्या वर्षी आणि यावर्षीही परदेशात गेलेल्या भारतीय महिलांनीही आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स घेतले आहे, असे आरटीओच्या ठाणे कार्यालयाच्या सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने सांगितले.

आंतरराष्ट्रीय चालक परवाना हा एक वर्षभरासाठी दिला जातो. हा मिळविण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, व्हिसा, दोन फोटो आणि मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र महत्वाचे आहे. ही सुविहित पद्धत  पूर्ण झाल्यानंतर सर्व बाबी ऑनलाइन फॉर्म भरून सर्व कागदपत्रे जोडावीत आणि आरटीओ कार्यालयात मुळ कागदपत्रे घेऊन उपस्थित राहणे महत्वाचे आहे, असे अशोक खेनट यांनी सांगितले.

गेली १५ वर्षांहून अधिक काळ मी अमेरिकेत कामानिमित्त राहिलो आहे. भारतात असलेल्या आईला १५ दिवसांसाठी भेटण्यासाठी आलो असून, १५ -२० दिवस गावी जाणार आहे. तेथून आल्यानंतर मी पुन्हा सौदीला काही कामासाठी जाणार आहे. मला तेथील रस्ते माहिती असून, वाहन चालविण्याचा अनुभव आहे. यावेळी भाडेतत्त्वावर वाहन घेऊन कामे करता येतील. त्यासाठी आंतरराष्ट्रीय परवाना काढण्यासाठी आलो आहे, असे ठाणे येथील एस. मोहन यांनी सांगितले.