ठाण्यात रस्त्यालगतची अवजड कोंडी सुटणार?; अखेर मॉडेला चेकनाक्याजवळ तात्पुरते ट्रक टर्मिनस सुरू

ठाणे : शहरात अवजड वाहने उभी करण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून कागदावर असलेलेल मॉडेला चेक नाक्याजवळील भूखंडावर ट्रक टर्मिनस अखेर सुरू झाले आहे. ही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असली तरी तोपर्यंत याठिकाणी ट्रक उभे करण्यासाठी तात्पुरती व्यवस्था तयार करण्यात आली आहे.

यामुळे मॉडेला चेक नाका आणि वागळे इस्टेटमधील रस्ता क्रमांक १६ येथे बेकायदा केली जाणाऱ्या ट्रक पार्किंगला पायबंद बसेल, असा पोलिसांचा दावा आहे.

ठाणे आणि मुंबई शहराच्या वेशीवर असलेल्या मॉडेला चेक नाक्याजवळ गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडी होत आहे. या मार्गावरून मुंबई, वागळे आणि तीन हात नाक्याच्या दिशेने वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. या मार्गावर गेल्या काही वर्षांपासून मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम सुरू असून यामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. वाहन संख्येच्या तुलनेत हा रस्ता अपुरा पडू लागल्याने मॉडेला चेक नाक्यापासून तीन हात नाक्यापर्यंत तसेच मॉडेला चेक नाक्यापासून वागळे इस्टेट रस्ता क्रमांक १६ पर्यंत वाहतूक कोंडी होते. या मार्गालगत गेल्या अनेक वर्षांपासून ट्रक उभे केले जात असून या ट्रकमुळे कोंडीत भर पडत होती. ही कोंडी कमी करण्यासाठी मॉडेला चेकनाक्याजवळील भूखंडावर ट्रक टर्मिनस उभारण्याची योजना पालिकेने आखली होती. ही योजना चार वर्षे कागदावरच होती. हे ट्रक टर्मिनस ठाणे महापालिकेने लवकर उभारले नाही तर ते लोकसहभागातून उभारू, असा इशारा आ. संजय केळकर यांनी दिला होता. दरम्यान, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी याठिकाणी पाहणी दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी मॉडेला चेक नाक्याजवळील भूखंड ट्रक टर्मिनसकरिता ताब्यात घेण्याचे आणि ही प्रक्रिया करत असतानाच त्याठिकाणी तातडीने तात्पुरते ट्रक उभे करम्ण्यासाठी व्यवस्था तयार करण्याचे आदेश दिले होते. यानुसार प्रशासनाने भूखंडाकडे जाण्यासाठी विकास आराखडय़ातील रस्त्याचे तात्पुरते काम केले असून विद्युत व्यवस्था आणि इतर सोयी सुविधा निर्माण करण्याची कामे सुरू आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दौऱ्यादमऱ्यान दिलेल्या आदेशानुसार मॉडेला चेक नाक्याजवळील भूखंडावर ट्रक उभे करम्ण्याची व्यवस्था करण्यात आली असून गेल्या आठवडय़ापासून याठिकाणी ५० ते ६० ट्रक उभे केले जात आहेत. रस्त्याकडेला ट्रक उभे केले जात नसल्यामुळे वाहतुकीस निर्माण होणारा अडथळाही कमी झाला आहे. याठिकाणी ट्रक टर्मिनसचे काम झाल्यावर सुमारे २०० ट्रक उभे राहू शकतील.

– शंकर पाटोळे उपायुक्त, ठाणे महापालिका