आयुक्तांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज जवळपास सहा ते सात लाख प्रवासी ठाणे स्थानकातून ये-जा करीत असतात. रेल्वेस्थानकातून इच्छितस्थळी प्रवाशांना सहज जाता यावे यासाठी स्थानकाच्या चारही बाजूंनी १५० मीटरच्या परिसरात एकही फेरीवाला दिसता कामा नये, असे स्पष्ट निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले.
आज संपूर्ण ठाणे स्टेशन परिसराची पाहणी आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली. यावेळी नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त शंकर पाटोळे, उपनगर अभियंता विकास ढोले, कार्यकारी अभियंता प्रशांत पाठक उपस्थित होते.
ठाणे स्थानकातून प्रवाशांना सहजपणे बाहेर पडता यावे यासाठी परिसर 24 x 7 या ठिकाणी सहाय्यक आयुक्त, प्रभाग अधिकारी, कर्मचारी व वर्दीतील पोलीस यांची नेमणूक करुन या परिसरात एकही फेरीवाला असणार नाही, स्थानकाच्या आवारात ज्या ठिकाणी बेघर व्यक्ती असतील त्यांना निवारा केंद्रात न्यावे, फेरीवाले, भिक्षेकरी, गुंड प्रवृत्तीची मंडळी गर्दुल्ले यांचा वावर राहणार नाही या दृष्टीने नियमित कारवाई व्हावी, सहाय्यक आयुक्तांची नेमणूक रोटेशन पध्दतीने करण्याचे श्री. बांगर यांनी सूचित केले.
नियमित कारवाई सुरू न राहिल्यास व फेरीवाल्याबाबत तक्रारी आल्यास नेमणूक केलेल्या अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी केला.
ठाणे स्थानकाच्या बाहेर एस टी स्टॅण्डला लागून दुचाकी उभ्या असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी या परिसरातील पार्किंगचा आढावा देखील घेतला. भाजी मंडई येथील वाहनतळ व नाईकवाडी येथील खाजगी वाहनतळाच्या हस्तांतरणाची कार्यवाही पुर्ण करुन ताब्यात घेण्याच्या सूचना त्यांनी शहर विकास विभागाला दिल्या.
अलोक हॉटेल समोरील असलेला रस्ता सद्यस्थितीत एकमार्गी आहे. परंतु या रस्त्यावर पादचारी नागरिक व रिक्षांची ये-जा असल्याने नागरिकांना चालणे त्रासाचे होते, यासाठी वाहतूक विभागाशी चर्चा करुन एकाच मार्गावरुन रिक्षा ये-जा राहिल व पादचारी नागरिकांना संपूर्णपणे उपलब्ध होईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना यावेळी आयुक्त श्री. बांगर यांनी दिल्या.