ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच आणि सहावर होणारी गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने या फलाटाच्या लांबीऐवजी रुंदी दोन मीटरने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सध्या अस्तित्त्वात असलेले रेल्वे रूळही काही अंतर पुढे नेण्यात येणार आहे. डिसेंबरमध्ये हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
फलाट क्रमांक पाचची रुंदी वाढल्यास जलद रेल्वेगाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असल्याचे मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी सांगितले.
अमृत भारत स्थानक योजनेची माहिती देण्यासाठी शुक्रवारी रजनीश कुमार गोयल हे ठाणे रेल्वे स्थानकात आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे रेल्वे स्थानक हे सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक आहे. दररोज स्थानकातून सहा लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर मुंबईहून कर्जत, कसारा, कल्याण, डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या जलद उपनगरीय रेल्वेगाड्या थांबतात. तर, पाचला जोडून असलेल्या फलाट क्रमांक सहावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जलद रेल्वेगाड्या थांबतात. काही एक्स्प्रेस गाड्यांनाही या फलाटांवर थांबा मिळतो. त्यामुळे संपूर्ण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच आणि सहावर तुलनेते गर्दी अधिक असते. या फलाटांवरील गर्दी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, फलाट क्रमांक पाचची रुंदी दोन मीटर इतकी वाढविण्यात येणार आहे.
या कामासाठी रेल्वे प्रशासन फलाट क्रमांक पाच रेल्वे रुळ काढून ते काही अंतर पुढे टाकले जाणार आहे. डिसेंबरमध्ये हे काम केले जाणार असून त्यासाठी किमान दोन दिवस फलाट क्रमांक पाच पूर्णपणे बंद ठेवावा लागण्याची शक्यता आहे.
ठाणे स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असून त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचे गोयल म्हणाले. पादचारी पूलांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पूल सॅटीसला जोडण्यात आला आहे. तसेच फलाट क्रमांक नऊवर येणाऱ्या ट्रान्स हार्बरच्या काही रेल्वेगाड्या फलाट क्रमांक दहावर थांबविण्यात येत असल्याचेही गोयल सांगितले. ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पूलाच्या कामासाठी महापालिकेकडून अद्यापही पुरेसा निधी उपलब्ध झाला नसल्याने पादचारी पूलाचे काम अपूर्ण असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले.