ठाणे रेल्वे एसटी आगारात गर्दुल्ले, तृतीयपंथीयांचा अड्डा

रात्रीच्या वेळी होतो वेश्या व्यवसाय

ठाणे: ठाणे रेल्वे स्थानक एसटी आगार गर्दुल्ले आणि गुंड प्रवृत्तीच्या तृतीयपंथीयांचा अड्डा बनला आहे. या आगारात रात्रीच्या वेळी दहशतीचे वातावरण असते. प्रवाशांची लूटमार करणे, आगाराच्या शौचालयात वेश्याव्यवसाय करणे असे प्रकार येथे चालतात. एकटी महिला अथवा असाह्य पुरुषावर येथे लैंगिक अत्याचार होण्याचा धोका असून आगाराची सुरक्षा पूर्णतः वाऱ्यावर आहे.

ठाणे रेल्वे स्थानकानजीकच्या एसटी आगारातून मीरा-भाईंदर, बोरिवली, जव्हार, वाडा, मोखाडा, मुरबाड, शहापूर, कल्याण, वसई, पालघर आदी भागात महामंडळाच्या बस जातात. येथून प्रवाशांना जाण्याकरिता इतर कोणतीही परवडणारी सार्वजनिक वाहने उपलब्ध नाहीत. रिक्षा मधून रात्रीचा प्रवास करणे असुरक्षित आणि महागडे असल्याने ठाणे रेल्वे स्थानकात रात्रीच्या वेळी उतरलेले प्रवासी एसटीवरच अवलंबून असतात. अशावेळी त्यांची शेवटची बस चुकली तर त्यांना एसटी आगाराचा आश्रय घ्यावा लागतो. रात्रीच्या वेळी मात्र येथे गर्दुल्ले आणि गुंडगिरी करणाऱ्या तृतीयपंथीयांचा वावर असतो. गर्दुल्ले, पाकीटमारांकडून प्रवाशांची लूटमार होते, तर गुंड प्रवृत्तीच्या तृतीयपंथीयांकडून देखील लुटमार आणि रात्रीच्या वेळी आगारातील शौचालयात वेश्या व्यवसाय केला जातो. असे असतानाही या आगारामध्ये एसटी महामंडळाची स्वतःची सक्षम सुरक्षा यंत्रणा उपलब्ध नाही. रात्री स्थानिक पोलिसांची एखादी गस्त होते, परंतु ते जाताच पुन्हा गर्दूल्ले आणि तृतीयपंथीयांचे राज सुरु होते. रात्री महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाचा फक्त एक सुरक्षा रक्षक येथे असतो. निळ्या गणवेषातील या सुरक्षारक्षकाला हे गुंड दाद देत नाहीत. त्यांच्याजवळ ब्लेड, चाकू सारख्या धारदार वस्तू असतात असे सुरक्षकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तर काहीशी अशीच परिस्थिती खोपट, वंदना या आगारांसह जिल्ह्यातील इतर आगारांची आहे.
आगारामधून शेवटची बस बोरिवली असून ती रात्री 12 वाजता सुटते. आगाराला कूठेही गेट नसल्याने रात्री कोणीही येते. पोलिस किंवा बोर्डाच्या सुरक्षा रक्षकाने विचारल्यास रेल्वे स्टेशनवर किंवा रस्त्यावर जायचे आहे असे सांगतात. काही जण तर सुरक्षा रक्षकाच्या अंगावर धावून जातात. त्यामुळे आगाराजवळ पोलिस चौकी हवी, असे सहाय्यक वाहतूक नियंत्रण अधिकारी सचिन जंगम यांनी सांगितले.

एसटी महामंडळाकडे ठाणे जिल्ह्यासाठी बोर्डाचे 59 आणि एसटी महामंडळाचे तीन सुरक्षा रक्षक आहेत. कल्याण आगार येथे एक आणि कळवा कार्यशाळेत दोन एसटीचे सुरक्षारक्षक ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती सुरक्षा आणि दक्षता अधिकारी रवींद्र जाधव यांनी दिली.