सव्वाशे वर्षांच्या आठवणींनी शहारल्या मनोरुग्णालयाच्या भिंती
ठाणे : पुढील काही दिवसांत ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय पाडण्यात येणार असून त्याजागी बंगळुरूच्या धर्तीवर ३२७८ खाटांचे अत्याधुनिक आणि सुसज्ज मनोरुग्णालय उभे राहणार आहे. या पार्श्वभूमीवर सव्वाशे वर्षांच्या जुन्या आठवणी कायमस्वरूपी मनात साठवण्यासाठी ‘नव्या वास्तूत जुन्या आठवणींचा प्रवास’ या भावनिक कार्यक्रमाचे आयोजन रुग्णालयात करण्यात आले होते.
१९०१ मध्ये स्थापन झालेले आणि ठाण्याच्या ओळखीचा अविभाज्य भाग असलेले हे रुग्णालय सुमारे ७२ एकर परिसरात पसरलेले असून सध्या १८५० खाटांची क्षमता आहे. मात्र आता याच ठिकाणी बंगळूरूच्या एनआयएमएचएएनएस धर्तीवर भारतातील एक अद्ययावत आणि भव्य मनोरुग्णालय उभारण्यात येणार आहे. नव्या रुग्णालयात एकूण ३२७८ खाटा, वैद्यकीय अधिकारी, तृतीय-चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी निवास, रुग्णांसाठी पुनर्वसन केंद्र, मुलांसाठी स्वतंत्र विभाग, ईसीटी, व्यवसाय उपचार, न्यूरोलॉजी विभाग, सर्जरी यांसारख्या आधुनिक सुविधा असणार आहेत.
या बदलाबद्दल उत्साह असला, तरी ज्यांनी काही दशके या जुन्या वास्तूंमध्ये काम केले त्यांच्यासाठी हे क्षण भावनिक होते. कार्यक्रमात अनेकांचे डोळे पाणावले. वास्तू पाडल्या जात असल्या, तरी त्यातील आठवणी कायम जपल्या जातील, असे मत रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमादरम्यान रुग्णालयाची चित्रफित देखील दाखवण्यात आली होती.
यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. नेताजी मुळीक, डॉ. संजय बोदडे, माजी वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय कुमावत, डॉ. पारस लव्हात्रे, डॉ. जी.एस.दाते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धीरज महांगडे, डॉ. ममता आळसपूरकर आदी आजी-माजी वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्य शासन लवकरच नव्या इमारतींचे बांधकाम सुरू करणार आहे. मनोरुग्णालयाची काही जागा रेल्वे आणि महापालिकेला विकासासाठी दिल्या आहेत, मात्र उरलेल्या भागात रुग्णालयाचा आधुनिकतेचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे.
या ठिकाणी १८९५ सालची कोनशिला असून, मनोरुग्णालय १९०१ मध्ये सुरू करण्यात आले. पुढे मुंबई, ठाणे, पालघर, अलिबाग, नाशिक, धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यासाठी हे मनोरुग्णालय बांधले गेले. त्यावेळी नवरोतमदास माधवदास यांनी रुग्णालय बांधकामासाठी सुमारे ३५ टक्के रक्कम दिली होती. आता येथील वास्तू जीर्ण झाल्या असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री प्रकाश अबीटकर यांच्या मार्गदर्शनाखाली एका नव्या जडणघडणीत रुग्णालय आकार घेणार आहे, अशी माहिती डॉ. नेताजी मुळीक यांनी दिली.