ठाणे : सर्वसामान्य जनतेला येणाऱ्या अडचणी सोडवणारे पोलिसच अडचणीत सापडल्याचे चित्र मंगळवारी सकाळी ठाण्यात दिसून आले. अज्ञात सायबर गुन्हेगारांनी चक्क ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी समोर आला. त्यामुळे पोलिसांची एकच धावपळ झाली.
ठाणे सायबर विभागासह गुन्हे शाखेचे पथक यांनी या घटनेप्रकरणी अथक परिश्रम घेऊन दुपार नंतर पोलिसांची वेबसाईट पुन्हा सुरू करण्यात आली. दरम्यान, हॅक बाय वन हॅट सायबर टीम असा संदेश या वेबसाईटवर दिसून आला. इंडोनेशियन डिफासर असे नाव हॅकरने लिहून खाली एक संदेश देखील लिहीला होता.
हा सायबर हल्ला सोमवारी रात्रीच्या सुमारास झाला असून रात्रीपासून ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक झाल्याचे समोर आले आहे. या वेबसाईटवरची सगळी माहिती गायब झाली आहे. या वेबसाईटवर ठाणे पोलीस अधिकार्यांची माहिती तसेच त्यांचे मोबाईल नंबर्सही होते. आता मात्र या वेबासाईटवर सांकेतिक भाषा दिसत आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक विभागाची मदत घेतली असून अनेक सायबर तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे. सायबर पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक तपास कामी लागले होते. त्यानंतर मंगळवारी दुपारी ही वेबसाईट पुन्हा सुरू झाली. हॅक बाय वन हॅट सायबर टीम असा संदेश या वेबसाईटवर दिसून आला. इंडोनेशियन डिफासर असे नाव हॅकरने लिहून खाली एक संदेश देखील लिहीला होता.