ठाणे: शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर खरी शिवसेना कोणाची याबाबत न्यायालयात आणि बाहेर काथ्याकूट सुरू होता. आता मूळ शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला ठाणे जिल्हा कोणत्या गटाचा याचा निकाल लावणारा दावा जनतेच्या न्यायालयात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आला आहे.
ठाण्याची शिवसेना व शिवसेनेचे ठाणे हे समिकरण गेल्या अनेक वर्षांपासून अबाधित आहे. पण शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर ठाणे हे नेमक्या कोणत्या शिवसेनेचे याचा फैसला जनतेच्या न्यायालयात करण्याची संधी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे गटासाठी ही लढाई केवळ आता अस्तित्वाची राहिली नसून प्रतिष्ठेचीही झाली आहे. विजयाचा कौल देऊन ठाणेकर कोणत्या शिवसेनेसोबत आहेत याचे गणित मांडणारी ही निवडणूक असून त्यावरच येणार्या विधानसभा व महापालिकेचे चित्र स्पष्ट होणार आहे.
शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्याने दिली. म्हणूनच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ठाण्यावर विशेष प्रेम होते. जिल्ह्यात ही शिवसेना तळागाळात रुजवण्यात कै आनंद दिघे यांची मोलाची भूमिका होती. मात्र आता शिवेसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. ठाणेकर एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे प्रमुख पक्षनेते बनले असून ते मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार हाकत आहेत. त्यांच्यासोबत शिंदे गटाचे आमदार, माजी नगरसेवक, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख असा मोठा फौजफाटा आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडे खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासारखे मोजकेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांची फळी आहे. या जोरावर हे दोन्ही शिवसेना आपले अस्तित्व टिकवण्याची धडपड करत असल्याचे दिसते. मात्र यामध्ये मतदारांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात असून त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून देणारी लोकसभेची निवडणूक ठरणार आहे.
शिंदे गटाकडे मुख्यमंत्र्याची ताकद व रसद आहे. तर ठाकरे गटाकडे तळागाळातील कट्टर शिवसैनिक आहे. सत्ता विरुद्ध निष्ठा अशी ही लढत असल्याचे मानले जाते. या प्रवाहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर स्वार होत शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. नगरसेवक, महापौर ते थेट खासदार असा पल्ला गाठण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे राजन विचारे तिसर्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असलेली सहानुभूती, मोदी विरोधी लाट मतांमध्ये परिवर्तीत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यामध्ये कोण बाजी मारणार हे ४ जूनला निकालात समोर येणार असले तरी २० मे रोजी होणारे मतदान त्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. म्हणूनच मतदारांना मतदानकेंद्रापर्यंत आणण्यासाठी या दोन्ही गटाच्या कार्यकत्यांनी कंबर कसली असल्याचे दिसते.
ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ठाणे हे शिवसेनेचे असल्याने त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात हा हक्काचा मतदारसंघ सोडला नाही. आपला बाणा कायम ठेवत त्यांनी तो मिळवला आणि आपला शिलेदार उभा केला. यावरून झालेल्या नाराजी नाट्यावरही त्यांनी फुंकर घातली.