ठाणे-मुंबईवरील पाणी कपातीचे संकट टळले

धरण क्षेत्रात दमदार पाऊस

ठाणे : आठवडाभरात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने ठाणे आणि मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे या शहरांवरील पाणी कपातीचे संकट टळले आहे.

ठाणे आणि मुंबईसह उपनगरांना पाणी पुरवठा करणाऱ्या बहुतेक धरणांमध्ये पाणीसाठा समाधानकारक झाला आहे. या दोन शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या भातसा धरणात ६२५.७३ दलघमि म्हणजे ६६.४२ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर मोडकसागर धरणात १०६ दलघमि (८२.९८ टक्के), तानसा १३९ दलघमि (९६.२६ टक्के) आणि मध्य वैतरणा १०२.५९ दलघमि (५३.०१टक्के) पाणीसाठा झाला आहे. ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या बारवी धरणात १८४.०८ दलघमि म्हणजे ५४.३३ टक्के पाणीसाठा झाला आहे.

पालघर जिल्ह्यातील धामणी धरणात ७८.८७ टक्के, कवडास धरणात ४४.७८ टक्के तर वांद्री धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. जुलै महिन्यातच धरणांमध्ये सरासरी ६५ टक्के पाणीसाठा झाल्याने ठाणे, मुंबई आणि उपनगरावरील पाणी टंचाईचे सावट दूर झाले आहे.