ठाणे-मुंबईत दरोडे घालणारी केरळी टोळी जेरबंद

ठाणे: केरळ येथून येऊन ठाणे मुंबईमध्ये दरोडा घालणाऱ्या केरळच्या दरोडेखोर टोळीला ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून लुटलेली दहा लाखाची रक्कम जप्त केली आहे.

विघ्नेश पोकेन के (३०), सुहात खोता टी पी (३१), प्रफूलदेव पुल्लिंवता (२५), अखिल पी व्ही (२७) आणि सुबीलेश बाळकृष्णन (३१)असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

काळबादेवी येथिल प्रॉमिस इंटरप्रिंसेस या कंपनीचा नोकर अरिफ अन्सारी हा मुंबई येथून तीस लाखांची रोकड घेऊन ठाणे रेल्वे स्टेशन येथिल बी कॅबिन येथे पार्क केलेली दुचाकी गाडी काढत असताना या लुटारूंनी तीस लाखांची रोकड लुटून नेली होती. त्याबाबत नौपाडा पोलिस ठाण्यात २१ फेब्रुवारी २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा धागादोरा नसताना या चोरट्यांना केरळ येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी सात लाख ५० हजार आणि चोरीच्या पैशातून खरेदी केलेले तीन लाखांचे दोन मोबाईल असा एकूण दहा लाख ५० हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.