ठाणे: अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठानिमित्ताने भाजपाच्या वतीने मासुंदा तलावाच्या काठावर भव्य दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. त्याचबरोबर १०० ढोल व ३० ताशांसह होणाऱ्या महावादनाच्या कार्यक्रमातून श्री रामाला वंदन केले जाणार आहे.
या वेळी भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि माजी खासदार संजीव नाईक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्ताने भाजपातर्फे ठाण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. `मिशन अयोध्या’अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार शहरातील मंदिरे व मंदिराचे आवार स्वच्छता करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. येत्या २१ जानेवारीपर्यंत शहरातील मंदिरांची सफाई केली जाईल. त्यानंतर २२ जानेवारी रोजी श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठावेळी मासुंदा तलावाच्या काठावर सायंकाळी ६ वाजता दीपोत्सव साजरा केला जाईल. या वेळी ठाणे येथील वीरगर्जना ढोल ताशे ध्वज आणि झांज पथक, मुंबईतील मोरया ढोल ताशे पथक आणि मुंबईतील झुंजार लेझीम, झांज आणि ध्वज पथकाच्या वतीने १०० ढोल व ३० ताशांच्या साह्याने महावादन कार्यक्रम केला जाईल. तसेच फटाक्यांची आतषबाजी केली जाणार आहे, असे भाजपाच्या नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले-भोसले यांनी सांगितले.
ठाणे शहरातील नागरिकांना श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पाहता यावा, यासाठी शहरातील १२ ठिकाणच्या मंदिराबाहेर भव्य एलईडी स्क्रीन लावून सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. त्याचबरोबर १ लाख भाविकांना लाडूवाटप केले जाईल, असे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी सांगितले. `अयोध्या मिशन’अंतर्गत ठाण्यातील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मेहनत घेतली जात आहे, असे ते म्हणाले.
कासारवडवली येथील प्राचीन श्री राम मंदिरात भाजपाचे पदाधिकारी राम ठाकूर यांच्या वतीने रामकथा कार्यक्रम सादर केला जात आहे. या कार्यक्रमाला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.