आमदार संजय केळकर यांच्या चळवळीला पाठबळ
ठाणे : ठाण्याच्या ऐतिहासिक-सांस्कृतिक ओळखीला तडा लावू पाहणाऱ्या हुक्का पार्लर-डान्स बार संस्कृती विरोधात आमदार संजय केळकर यांनी सुरू केलेल्या चळवळीला यश आले आहे. पोलीस प्रशासनाने या कामी स्वतंत्र पथक नेमले असून काल रात्रीपासूनच शहरात या अवैध धंद्यांवर धाडसत्र सुरू झाल्याची माहिती मिळते.
आमदार संजय केळकर यांनी फेब्रुवारीपासून हुक्का पार्लरमुक्त ठाणे ही चळवळ सुरू केली होती. स्थानिक पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्त, गृहमंत्री , विधिमंडळ आदी ठिकाणी पत्र, निवेदने देऊन, प्रत्यक्ष भेटी घेऊन ही समस्या मांडली. त्यावेळी थातूर-मातूर कारवाई होत होती, पण हुक्का पार्लर पब्ज, अवेळी चालणारे डान्सबार यांना संगनमताने पाठीशी घातले जात होते. अखेर आमदार केळकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोशयारी आणि पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेतली. भेटी दरम्यान आयुक्तांनी अधिकाऱ्यांना बोलावून कडक कारवाईचे स्पष्ट निर्देश दिले आणि स्वतंत्र पथक स्थापन केले. काल रात्री शोध मोहीम घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
अनधिकृत हुक्का पार्लर आणि रेस्टॉरंटची यादी श्री.केळकर यांनी आयुक्तांना सादर केली आहे. २०१८च्या अध्यादेशानुसार हुक्का पार्लरला बंदी आहे. ठाण्यात ड्रग्जमुळे नुकतेच एक तरुणाचा मृत्यू झाला आहे. ठाणे हे हुक्का पार्लरचे शहर नसून ऐतिहासिक, सांस्कृतिक शहर आहे. हे शहर हुक्का पार्लरमुक्त करण्यासाठी पुढील काळात रस्त्यावर उतरणार असल्याचे आ. केळकर यांनी सांगितले.