ठाणे तापले, पारा ४१ अंशपार

ठाणे – फेब्रुवारीपर्यंत रेंगाळलेल्या गुलाबी थंडीने होळी आधीच पळ काढला असून तापमानात गेल्या तीन दिवसांत कमालीची वाढ झाल्याचा अनुभव सध्या ठाणेकर घेत आहेत. मार्चच्या पहिल्या तारखेलाच तापमानाने ४० अंशाचा पारा गाठला असून बुधवारी २ मार्चला सर्वाधिक ४१ अंश तापमानाची नोंद झाली आहे. मे महिन्यात अंगाची लाहीलाही करणारा उकाडा मार्चच्या सुरुवातीपासूनच जाणवू लागल्याने ठाणेकर घामाघूम झाले असून गेल्या तीन महिन्यांपासून बंद असेलेले एसी- कुलर पुन्हा सुरू होऊ लागले आहेत.

होळी पेटली की गुलाबी थंडी सरते आणि ग्रीष्म ऋतूला सुरुवात होते अशी आतापर्यंतची मान्यता आणि सर्वसामान्यांचा अनुभव आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून बदललेल्या हवामानामुळे आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढलेल्या चटक्यामुळे अचानक तापमानात वाढ झाली आहे. त्याचा फटका ठाण्यालाही बसला आहे. ठाणे पालिका क्षेत्रामध्ये २८ फेब्रुवारीला कमाल ३९ अंश तापमानाची नोंद झाली. १ मार्चला ४० तर २ मार्चला चक्क ४१ अंश तापमानाची नोंद झाली आहे. मे महिन्याच्या पंधरवड्यात ठाण्यात ४० अंश तापमानाची नोंद होते. मात्र यंदा मार्चच्या सुरुवातीलाच पारा ४१ वर पोहचल्यामुळे येणारा उन्हाळा किती तापदायक असेल या चिंतेने ठाणेकर आणखी घामाघूम झाले आहेत.

सकाळी गारवा, दुपारी कडाक्याचे उन

सकाळी ९ वाजेपर्यंत वातावरणात थोडासा गारवा अजूनही कायम आहे. मात्र सूर्य माथ्यावर येताच उन्हाचे चटके वाढू लागले असल्याचा अनुभव ठाणेकरांना येत आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून मंदावलेल्या पंख्यांची गती आता वाढू लागली आहे. तर रात्रीही उकाडा जाणवत असल्याने एसी, कुलरच्या थंड हवेचा आसरा ठाणेकर घेताना दिसत आहेत