ठाण्यात वीजेवरील बसगाड्याची तपासणी सुरु; अहवालानंतरच बस खरेदीचा मार्ग मोकळा होणार

पहिल्या टप्प्यात ४० बसगाड्या परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार

ठाणे महापालिका क्षेत्रातील पर्यावरणाचा समतोल राखला जावा, या उद्देशातून ८१ वीजेवरील बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ४० बसगाड्या परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहे. या बसगाड्यांची बॅटरी तसेच इतर तांत्रिक बाबी तपासणीचे काम मागील काही दिवसांपासून सुरु असून, हे काम येत्या दोन दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या तपासणी अहवालानंतरच बस खरेदीचा मार्ग मोकळा होणार आहे.

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यातील २७७ बसगाड्या शहरातील ९८ मार्गांवर चालविण्यात येत आहेत. त्यात टीमटीच्या स्वत: च्या ६७ बसगाड्या आहेत. तर, उर्वरित जीसीसी तत्वावर ठेकेदारामार्फत चालविण्यात येणाऱ्या बसगाड्यांचा समावेश आहे. शहरातील प्रवाशी संख्येच्या तुलनेत टीएमटीच्या ताफ्यातील बसगाड्या अपुऱ्या पडत आहेत. यामुळे या बसगाड्यांची संख्या वाढविण्यावर परिवहन समिती तसेच महापालिका प्रशासनाक़डून भर दिला जात आहे. असे असतानाच केंद्र आणि राज्य शासनाकडून स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत टीएमटीला वीजेवरील बस खरेदी करण्यासाठी ३८ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून ८१ वीजेवरील बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या बस खरेदीसाठी महापालिकेने निविदा काढल्या होत्या. त्यात दोन कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या असून या कंपन्यांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या बसगाड्यांची तपासणी पालिकेने सुरु केली आहे. यासाठी पालिकेने एका कंपनीची नेमणूक केली आहे. शहराच्या विविध भागात ही बसगाडी चालविण्यात येथ असून त्यात प्रवासी वाहतूक क्षमता, बॅटरी क्षमता तसेच इतर तांत्रिक बाबी तपासण्यात येत आहेत. नुकताच आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यासह पालिका अधिकाऱ्यांनी या बसमधून प्रवास केला.

४१ वातानुकूलीत तर ४० साध्या बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय –

ठाणे शहरातील ९८ पैकी ९५ टक्के मार्ग २० किमीपेक्षा कमी अंतराचे आहेत. उर्वरित मार्ग शहराबाहेरील असून ते २० किमीपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे शहरातील अंतर्गत मार्गांवर साध्या बसगाड्या चालविण्याचा तर बाहेरील मार्गावर वातानुकूलीत बसगाड्या चालविण्याचा विचार करून ४१ वातानुकूलीत तर ४० साध्या बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय परिवहन समितीच्या सभेत घेण्यात आला होता. या निर्णयानुसार नऊ मीटरच्या २६ तर १२ मीटरच्या १५ वातानुकूलीत बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहे. तर नऊ मीटरच्या ३० साध्या बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहेत.