ठाणे सायबर सेलने मिळवून दिली १० लाखांहून जास्त रक्कम

ठाणे : ठाण्याच्या सायबर सेलने या वर्षाच्या जानेवारी ते एप्रिलपर्यंत आठ नागरिकांना तब्बल १० लाख ४८ हजार १६९ रुपये मिळवून दिले आहेत. फसवलेल्यांच्या चेह-यावर हास्य असले, तरी संबंधित व्यक्तींनी निष्काळजीपणा केल्याचे निष्पन्न झाले.

यापैकी बरेचजण सुशिक्षित असूनही त्यांनी केलेले आर्थिक व्यवहार करताना कोणतीही काळजी बाळगली नव्हती, हे स्पष्ट होते, असे पोलीस अधिका-यांनी सांगितले. आॅनलाईन फ्रॉड संबंधित नागरिकांनी तत्काळ सायबर सेल येथे संपर्क साधल्यानंतर सायबर सेलकडून संबंधित मर्चंट आणि ई वॉलेटस् यांना इ मेलद्वारा पत्रव्यवहार करुन तक्रारदार यांची फसवणूक झालेली रक्कम पुन्हा खात्यामध्ये परत जमा करण्यात येते.

या प्रक्रियेनुसार सन २०२२ मध्ये ५४ नागिरकांना तब्बल ४४ लाख १५ हजार रुपये परत मिळवून दिले होते. यावर्षीही आठ नागरिकांना १० लाखांहून अधिक रक्कम परत मिळवून देण्यात आली.

लॉकडाऊन काळात ऑनलाइन बँकिंगचा वापर वाढला असून याचा फायदा घेत सायबर गुन्हेगार अधिक सक्रिय झाले आहेत. यामुळे फसवणुकीच्या गुन्ह्यांत वाढ झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली. सायबर गुन्हेगारांना पकडण्यासाठी त्यांनी गुन्ह्यात वापरलेला मोबाइल क्रमांकाचा शोध (ट्रेसिंग) घेण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्याचाच फायदा गुन्हेगार घेत असतात. त्याचेच आव्हान उभे ठाकले असल्याचे ‘सायबर’च्या पोलीस अधिका-यांनी सांगितले.

हे गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले, मात्र आपल्या बँक खात्यांची माहिती फोनवर देऊ नका. बँकेचे खाते सुरक्षित ठेवणे ही प्रत्येक खातेदाराची जबाबदारी आहेच, तशीच बँकेचीही आहे. मात्र, बँका नागरिकांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्याबाबत गंभीर नाहीत, अशी टीका पोलिसांनी केली आहे.

ऑनलाइन व्यवहारांत गुन्हेगार विविध मार्गांनी ठेवीदारांची फसवणूक करतात याची माहिती पोलिसांनी दिली. त्यापैकी आपला ओटीपी किंवा खात्यांची कोणतीही माहिती फोनवरून समोरच्या अनोळखी व्यक्तीला अजिबात देऊ नका. ठेवींची सुरक्षितता जपण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना पोलिसांनी केले आहे.

१ जानेवारी ते ३० एप्रिल २०२३मध्ये दाखल झालेले गुन्हे
डेबिट / क्रेडिट : ०८, ऑनलाईन फसवणूक : ०६ , सोशल मिडीयाद्वारे : ०९, नोकरी – लॉटरीचे आमिष : ०६ , लोन :०४ , लाईट बील : ०२ ., इतर : ०६ _…. एकूण : ३९.

तांत्रिक मदतीसाठी प्राप्त प्रकरणे आणि तक्रारी

डेबिट / क्रेडीट : ६७ . ऑनलाईन फसवणूक : ६९., सोशल मिडीयाद्वारे : १५., नोकरी व लॉटरीचे आमिष : २२ ., लोन : २६., ओएलएक्स : १८., लाईट बील : १५ आणि इतर : २४८ एकूण ४८०.