सल्फ्युरिक ॲसिड घेऊन जाणाऱ्या टँकरला गळती

अंबरनाथ: अंबरनाथ येथून पुणे येथे सल्फ्युरिक ॲसिड घेऊन जाणाऱ्या एका टँकरला भर रस्त्यात गळती लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अंबरनाथ नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने रस्त्यावर सांडलेल्या ॲसिडवर फोमचे फवारे मारून ते नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

येथील वडोल एमआयडीसीमधील एका कंपनीतून सल्फ्युरिक ॲसिड घेऊन जाणाऱ्या टॅंकरमधून कल्याण-बदलापूर रोडवर असलेल्या महात्मा गांधी शाळेजवळ आज सोमवारी दुपारी अचानक गळती सुरू झाल्याने रस्त्यावर वाफ निर्माण झाली होती.

टॅंकर थांबवून अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी गळती थांबवण्यासाठी प्रयत्न करून रस्त्यावर पडलेल्या सल्फ्युरिक ॲसिडला फोम फोर्सचा वापर करून रस्ता स्वच्छ केला. अग्निशमन दलाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने संभाव्य अपघात टळला. त्यानंतर टॅंकर पुन्हा कंपनीत नेण्यात आला.