आमदार संजय केळकर लोकसभेसाठी तयार
ठाणे: नगरसेवकांच्या संख्येचे निकष दाखवून भाजपकडून ठाणे मतदारसंघ शिवसेनेने घेतला. त्यानुसार सध्या भाजपा आमदारांची संख्या अधिक असल्याने ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपचाच आहे. आणि पक्षाने आदेश दिल्यास मी लढायला तयार आहे, असे स्पष्ट करत आमदार संजय केळकर यांनी थेट रिंगणात उडी घेतली आहे.
महायुतीत लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राज्यातील काही जागांवर महायुतीने अद्याप त्यांचे उमेदवार जाहीर केले नाहीत. ठाणे लोकसभेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. युतीत ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे होती. मात्र शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी मात्र शिवसेनेच्या ठाकरे गटात राहणं पसंत केलं. त्यामुळे शिंदे गटाकडे या मतदारसंघात तगडा उमेदवार नसल्याचं बोललं जात आहे. मात्र शिंदे गटाने या जागेवरील दावा सोडलेला नाही. अशातच ठाण्याचे आमदार आणि भाजपा नेते संजय केळकर यांनी ठाणे लोकसभेची जागा भाजपाला मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच ते या जागेवरून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार संजय केळकर म्हणाले, ठाण्याची जागा कोणाकडे जाणार याबाबत निर्णय झालेला नाही. ही जागा भाजपाला मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. पक्षाने आम्हाला संधी दिली तर मी स्वतः आनंदाने ठाण्याची लोकसभा लढायला तयार आहे. यासाठी कार्यकर्ते नक्कीच मला मदत करतील. मी निवडणुकीला उभा राहिलो तर मला जिंकवण्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद माझ्या पाठीशी आहे.
शिवसेनेचे प्रकाश परांजपे यांच्याआधी भाजपाचे राम कापसे ठाण्याचे खासदार होते. ते दोन वेळा येथून निवडून आले होते. त्यानंतर ठाण्यातील नगरसेवकांचे गणित मांडून ही जागा शिवसेनेला देण्यात आली. आता ठाण्यात आमचे आमदार अधिक आहेत. नगरसेवकही आहेत त्यामुळे ही जागा भाजपाला मिळाली तर भाजपाचा कार्यकर्ता आणखी जोमाने काम करेल, असेही श्री केळकर यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, ठाणे लोकसभेचे तार्किकदृष्ट्या गणित मांडले तर येथे भाजपाची ताकद दिसून येईल. सर्व काही केवळ गणितावर अवलंबून नसते. ठाण्यातचे खासदार उद्धव ठाकरे गटात आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणचे गणित बदलले आहे. अखेर सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील, असेही श्री.केळकर यांनी स्पष्ट केले.
आमदार संजय केळकर हे आमदार म्हणून कमालीचे यशस्वी ठरले असून केवळ ठाणे विधानसभा मतदारसंघ नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात त्यांचा सातत्यपूर्ण संपर्क आणि काम आहे. तर दुसरीकडे एक सुशिक्षित, सुसंस्कृत, अभ्यासू चेहरा म्हणून त्यांची सर्वदूर ओळख आहे. केवळ भाजपातच नव्हे तर अन्य पक्षातही त्यांना पसंती आहे. त्यामुळे ठाणे लोकसभेसाठी स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.