हेलिपॅडची तरतुद होणार
ठाणे : सन 1936 मध्ये ठाण्यात उभारण्यात आलेल्या ‘सिव्हील हॉस्पिटल’चा संपूर्ण चेहरामोहरा येत्या काही वर्षांत बदललेला दिसणार आहे. कारण सध्या असलेल्या जागेवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची भव्य इमारत उभा राहणार आहे. रुग्णांच्या सेवेसाठी हेलिपॅडचाही समावेश आहे, असे सूत्रांकडून समजते.
वागळे इस्टेट येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राजवळील मनोरुग्णालयाच्या जागेत अपघात विभागासह शवगृहदेखील तात्पुरते स्थलांतरित होणार आहे. या ठिकाणी सध्या दिवाबत्तीचे काम सुरु असल्यामुळे विविध रुग्ण विभाग स्थलांतर केले नसून, ही कामे लवकरच संपणार आहेत, असे कळते. रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी रूग्णालय प्रशासनाकडून घेतली जात आहे.
सिव्हील हॉस्पिटलच्या जुन्या दगडी बांधकामात क्षयरोग, परिचारिका प्रशिक्षणार्थी इमारत आदीं विभागांचा समावेश होता. परंतु आता रूग्णालयातील अपघात विभागासह शवागृह आदी बांधकामे तोडून रुग्णालय रिकामे केले जाणार आहे. येत्या महिन्याभरात सर्व बांधकाम पाडून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नव्या बांधकामांची सुरुवात होणार आहे. नवीन बांधकामे 18 महिन्यांंत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रुग्णालय बांधकामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निविदेनुसार या सुपर स्पेशालिटींच्या विविध बांधकामांकरीता 527 कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दै. ‘ठाणेवैभव’ला दिली. यामुळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामांचा मार्ग खुला झाला.
‘एआरटी, क्षयरोग, रुग्ण कक्ष जुना बाह्य रुग्ण कक्ष,रुग्ण कक्ष, परिचारिका प्रशिक्षणार्थी इमारत, डीआयसी आदीचे बांधकाम पाडण्याचा निर्णय सर्वप्रथम झाला होता तसेच अपघात विभाग, आयुष, शवगृह आदी विभाग सिव्हील’मध्ये ठेवले जातील, असे ठरले होते. परंतु सुपर स्पेशालिटीच्या अनेक बांधकामांमध्ये एकही अडचण न येता आधीचा निर्णय माघारी घेण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार सुपर स्पेशालिटीचा मार्ग खुला झाला आहे.
बांधकाम रुग्णालयासाठी विविध कार्यादेश येत्या आठवड्यात दिले जाणार आहेत आणि नवीन रुग्णालयाचे काम सुरू होईल. त्यासाठी आवारातील सुमारे 18 लहान-मोठे बांधकामे पाडली जातील, असे सांगण्यात आले.
नव्या रुग्णालयाची उभारणी करताना तांत्रिक गोष्टींचाही विचार करण्यात आला आहे. ‘सिव्हिल’मधील प्रसुती कक्ष,बाल कक्ष, कुपोषित बालकांचे सेंटर, नेत्रविभाग, अतिदक्षता , सर्जरी, ऑर्थो, इएनटी, फिजिओथेरपी, ब्लडबँक, प्रयोगशाळा, किचन, अपघात विभाग, आयुष, शवागृह आदींचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी दिली.