ठाणे: एके काळी ४१ टक्के भ्रष्टाचार प्रकरणाने ठाणे गाजले होते. त्या प्रकरणाचा निकाल लागला नसला तरी ठाणे शहराची पाठ मात्र ४१ हा आकडा सोडत नाही. आज ठाणे शहराचे तापमान थेट चाळीशी पार गेले.
फेब्रुवारी महिन्यात ९ तारखेला ४० तर १० तारखेला ४१ अंश तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे एकंदरीत ऐन थंडीत हा महिना ‘हॉट’ ठरला आहे. हवामान बदलामुळे चार दिवस तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. तो खरा ठरला आहे.
गेल्या तीन चार दिवसांपासून गुलाबी थंडीची जागा घाम गाळणार्या उष्णतेने घेतली आहे. ठाणेही त्याला अपवाद नाही. जिल्ह्यात बुधवारी कल्याण, बदलापूर या शहरांमध्ये ३८.८ अंश तापमानाची नोंद झाली होती. त्या खालोखाल ठाण्याचे तापमान ३८.४ व मुंब्य्राचे तापमान ३८.१ अंश नोंदवले गेले होते. मात्र गुरुवारी ठाण्याचे तापमान ४०.१ अंशावर झेपावले आहे. यामध्ये ठाणे पालिका येथील केंद्रात ४०.१, कावेसर येथील केंद्रात ४० तर विटावा येथील केंद्रात ४०.१ अंश तापमनाची नोंद झाली आहे. शहराचे किमान तापमान ३०.२२ आहे. पण हिट इंडेक्स किमान २५ अंश तर कमाल ४१ अंश नोंदवला गेला आहे.
किमान तापमानाची नोंद ही सांयकाळनंतर होत आहे. त्यामुळे रात्री ते पहाटेपर्यंत वातावरणात थोडासा गारवा जाणवत आहे. पण सकाळी १० नंतर उष्णतेत वाढ होताना दिसत आहे. दुपारी उन्हाचे चटके वाढले असून घामाच्या धारा वाहत आहेत. आता शुक्रवारपासून दहावीची परीक्षाही सुरू होत आहेत. त्यामुळे वाढत्या उष्णतेचा फटका बसू नये यासाठी जास्तीत जास्त पाणी पिण्याचा तसेच थेट उन्हापासून बचाव करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान वाढत्या उकाड्यासोबतच सरबते, उसाच्या रसवंती गृहांमध्येही गर्दी वाढल्याचे चित्र असून गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले एसी पुन्हा सुरू झाले आहेत.
फेब्रुवारी महिन्याचे उच्चतम तापमान
९ फेब्रुवारी ४० अंश
१० फेब्रुवारी ४१ अंश
११ फेब्रुवारी ३९ अंश