सचिन शिंदे यांनी स्पष्ट केली भूमिका
ठाणे: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ७२ तासात दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, मात्र यात ते कुठेही दोषी दिसत नाहीत. असे असतांनाही त्यांचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आव्हाड यांच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ठाणे शहर कॉंग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांनी केली आहे. तसेच कॉंग्रेस पूर्णपणे आ.जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हरहर महादेव आणि त्यानंतर मुंब्य्रात एका महिलेला गर्दीतून कशाला जाता बाजूला व्हा असे सांगत त्या महिलेला बाजूला करण्याचा प्रयत्न आव्हाड यांनी केला. मात्र या प्रकरणाचा व्हिडीओ पाहिल्यास त्यात कुठेही आव्हाड यांनी विनयभंग केला आहे, हे कुठेही दिसत नाही.त्यातही ही घटना घडली त्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाडीत होते. त्यामुळे त्यांनी ही घटना पाहिलेली आहे. त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी असेही त्यांनी सांगितले. परंतु आव्हाड यांनी जाणून बजून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. परंतु कायद्याची मोडतोड करुन आपल्या सोईप्रमाणे कायदे वापरण्याची पंरापरा राज्यात सुरु झाली आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील जनता हे कदापी सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुरक्षा याबाबतीत विभाग कसा चालतो, ते गृहविभागाने पाहिले पाहिजे. यावेळी, पोलिसांनी देखील आपली जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडणे अपेक्षित होते परंतु पोलीससुद्धा कायद्याने वागत नसल्याचे निदर्शनास येत आहे. एखाद्या माजी कॅबीनेट मंत्र्यावर ७२ तासात दोन गुन्हे दाखल होतात,तेही जे त्यांनी केलेलेच नाहीत. त्यामुळे कायद्याची भिती दाखविण्याचाच हा प्रकार असून आव्हाड यांच्यावर करण्यात आलेल्या चुकीच्या कारवाईचा ठाणे शहर कॉंग्रेस याचा निषेध करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.