ठाण्याच्या अर्थसंकल्पाला मिळणार शासनाकडून रसद

ठाणे : मुंबईप्रमाणे ठाण्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवा अशी घोषणा नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमात केली होती. त्यामुळे ठाण्याच्या विकासकामांसाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात शासनाकडून भरीव तरतूद होण्याची दाट शक्यता आहे, त्यानंतरच अर्थसंकल्प सादर करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. मालमत्ता आणि पाणीपट्टी वसुलीसाठी देखील या आर्थिक वर्षातील काही दिवसच शिल्लक आहेत. दुसरीकडे ठाणे महापालिकेचा अर्थसंसंकल्प हा साधारणतः फेब्रुवारीच्या अखेरीस सादर केला जातो. मात्र यावर्षी पहिल्यांदाच ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प मार्च महिना उजाडला तरी सादर करण्यात आलेला नाही. अर्थसंकल्प कधी सादर करणार याबाबत तारीख देखील निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे अर्थसंकल्पाला नेमका विलंब का होत आहे याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

दुसरीकडे ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची एकाच वेळी कामे सुरु करण्यात आली असून यासाठी शासनाकडून कोट्यवधीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.  काही प्रमाणात निधी ठाणे महापालिकेला वर्गही झाला आहे. एक काळ असा होता कि ठाणे महापालिकेला संपूर्ण शासनाच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागत होते. शहरात मोठ्या प्रमाणात सौंदर्यीकरणाची कामे देखील सुरु आहेत. मुख्यमंत्रीच ठाणेकर असल्याने आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेऊन बालेकिल्ला सांभाळण्यासाठी ठाण्याच्या अर्थसंकल्पात जेवढी भरीव तरतूद शासनाकडून अनुदानाच्या स्वरूपात देता येईल तेवढी करण्याचा शासनाचा मानस असल्याने या निधीचे नियोजन झाल्यानंतरच ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.