ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंची बारा पदकांची लयलूट

भिवंडी महापौर चषक स्पर्धा

ठाणे : भिवंडी येथे नुकत्याच पार पडलेल्या या वर्षातील दुसऱ्या जिल्हास्तरीय खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन ॲकॅडमीच्या खेळाडूंनी बारा पदकांची लयलूट करून वर्चस्व कायम ठेवले. गतवर्षी ॲकॅडमीने दहा पदके पटकावली होती.

भिवंडी येथे झालेल्या खुल्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धेतील ठाणे बॅडमिंटन खेळाडूच्या अकॅडमीच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत पुरुष एकेरीमध्ये तनय जोशी या उभरत्या खेळाडूने अतिशय दिमाखदार कामगिरी करत करीत अजिंक्यपद आपल्या नावे केले आहे. पहिल्या फेरीच्या सामन्यापासूनच वर्चस्व प्रस्थापित करीत त्याने आपले इरादे स्पष्ट केले होते. तनयने उपांत्य फेरीच्या लढतीत मयूर परब याचा 15-8, 15-12 असा पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अंतिम फेरीच्या लढतीत विजेतेपदाचा मुख्य दावेदार असणारा सार्थक वाडेकर याचा अटीतटीच्या सामन्यात त्याने 21-11, 21-18 असा पराभव करीत सुवर्णपदक आपल्या नावी केले. त्याचप्रमाणे याच स्पर्धेत पुरुष दुहेरी मध्ये तनय जोशी याने कांस्यपदक पटकावले आहे.

17 वर्षाखालील मुलांच्या गटात ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी सर्वच पदके आपल्या नावी करण्याची किमया साध्य केली आहे. या गटात अद्वैत कर्नाटकी याने कांस्यपदक, तर पुन्हा एकवार तनय जोशी याने रौप्य पदक, तर यश ढेंबरे याने सुवर्णपदक पटकावले आहे. या स्पर्धेत एकूण तीन पदके पटकावणारा तनय जोशी हा एकमेव खेळाडू ठरला व यश ढेंबरे याने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेतील अजिंक्य पदक आपल्या नावी केले आहे.

या हंगामात सलग चार राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा जिंकून एल्फी एम या खेळाडूने यापूर्वीच आपल्या नावाचा डंका संपूर्ण राज्यात वाजविला होता. या स्पर्धेत देखील तेरा वर्षाखालील मुलांमध्ये हा खेळाडू अजिंक्य वीर ठरला आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत त्याने ठाणे बॅडमिंटन अकॅडमी मधीलच यज्ञेश वारघडे या खेळाडूचा 15-2, 15-5 असा सहज पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली. या फेरीच्या सामन्यात त्याने प्रितेश भोये या खेळाडूचा 15-11, 15-8 असा पराभव करीत सुवर्णपदकावर आपले नाव पुन्हा एकवार कोरले. पंधरा वर्षाखालील मुलांच्या एकेरीच्यागटात देखील अल्फीने कांस्यपदक पटकावले आहे. तर याच गटात ठाणेकर खेळाडू चंद्रांशू गुंडले याने रौप्य पदक आपल्या नावे केले आहे. १३ वर्षाखालील मुलींच्या गटात शनाया तवाते हिने कांस्यपदकाला गवसणी घातली आहे. तसेच पंधरा वर्षाखालील मुलींच्या गटात शुभ्रा कुलकर्णी हिने कांस्यपदक आपल्या नावी केले. अशाप्रकारे एकूण 12 पदकांची लयलूट करीत या खुल्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत ठाणेकर खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे.