ठाणे : ठाणेकर असलेल्या अस्लम इनामदार यांच्याकडे राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. ही स्पर्धा 21 मार्च २०२४ पासून अहमदनगरला सुरू झाली आहे.
राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा तसेच छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धेतील कामगिरीनुसार प्राथमिक संघ निवडण्यात आला होता. त्यातून अंतिम संघाची निवड झाली आहे. मुख्य प्रशिक्षक शांताराम जाधव व सहाय्यक प्रशिक्षक दादासाहेब आव्हाड आहेत आणि व्यवस्थापक शंतनू पांडव हे आहेत.
अहमदनगर येथील जिल्हा क्रीडा संकुलात राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी राज्याच्या संघाची निवड अहमदनगरला झाली आहे. त्यातून 12 जणांचा संघ जाहीर करण्यात आला. या संघात राज्य विजेत्या मुंबई शहर आणि उपविजेत्या अहमदनगर संघाचे प्रत्येक तिघे खेळाडू आहेत. ठाणे, नाशिक, रायगड, नांदेड उपनगर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येकी एकाची निवड झाली आहे.
गतवर्षी हरयाणा येथील चरखी दादरी येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील निर्णायक लढतीमध्ये महाराष्ट्राचा संघ रेल्वे विरुद्ध पराभूत झाला होता. यापूर्वी महाराष्ट्रातील स्पर्धा सन 2019 मध्ये रोहा येथे झाली होती. त्यातही महाराष्ट्राचा संघ तिसरा होता. अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव संघाचे प्रशिक्षक आहेत.
राज्याच्या संघाचे कर्णधार अस्लम इनामदार ठाणे येथील आहेत. आकाश शिंदे उपकर्णधार नाशिक येथील आहेत. या व्यतिरिक्त संकेत सावंत, हर्ष लाड, प्रणय राणे (सर्व मुंबई शहर) तसेच आदित्य शिंदे, शंकर गदई, शुभम राऊत हे सर्व अहमदनगरचे असून मयूर कदम रायगडचे आणि किरण मगर नांदेडचे आहेत तसेच अरकम शेख उपनगराचे असून ओमकार कुंभार रत्नागिरीचे आहेत.