ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत मागील आठवड्यात पूर्ण झाली असून ४७ पैकी २२ प्रभागांमध्ये महिला राज येणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र दिग्गज नगरसेवकांच्याच हाती कारभाराची दोरी राहील, असे चित्र सध्या तरी दिसत आहे.
तीन सदस्यीय पॅनल पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीत २२ प्रभागांमध्ये दोन महिला नगरसेवकांचे वर्चस्व असले तरी त्यापैकी निम्म्याहून अधिक प्रभागांमध्ये पालिकेत ‘दबदबा’ असलेल्या नगरसेवक पुन्हा येणार असल्याने तेच या प्रभागांचे तारणहार’ ठरणार असल्याची चर्चा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मागील शुक्रवारी आरक्षण जाहिर करण्यात आले. यामध्ये नागरीकांचा मागासवर्ग, नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) या १५ जागांसाठी सोडत काढण्यात आली. तर सर्वसाधारण खुल्या गटासाठी २२ जागांसाठी चिठ्ठी काढून आरक्षण काढण्यात आले. त्यातच यापूर्वी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले होते. त्यात सोडतीद्वारे नव्याने आरक्षण निश्चित आल्याने तब्बल २२ प्रभागातील दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. मात्र तिसऱ्या जागेवर निवडणूक लढवण्याचा मार्ग पुरुषांना मोकळा झाला आहे. यामध्ये अनेक दिग्गजांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण आरक्षणाचा आढावा घेतला असता अनेक मातब्बरांच्या ते पथ्यावर पडल्याचे दिसत आहे.
वास्तविक महापालिकेमध्ये आरक्षणामुळे ५० टक्के जागा महिलांच्या वाटेला आल्या आहेत. गेल्या निवडणुकीतही आरक्षणाव्यतरिक्त ११ जागा जागांवर महिला नगरसेविका निवडून आल्या होत्या. पण पालिकेचा एकूण कारभार पाहता प्रशासनावर सर्वाधिक मातब्बर पुरुष नगरसेवकांचीच पकड असल्याचे दिसते. आरक्षित जागेमुळे महापौरपदाचा मान पहिल्या टर्ममध्ये मिनाक्षी शिंदे यांना मिळाला. आपल्या कार्याने त्यांनी या पदाची छाप काही दिवसांतच पाडली. पण हा अपवाद वगळता गेल्यावेळी कोणतेही मोठे पद महिला नगरसेविकांना देण्यात आले नाही. मिनाक्षी शिंदे, पल्लवी कदम वगळता इतर महिला नगरसेविका प्रभाग समिती सभापती आणि बालकल्याण सभापती इत्यादीपुरतेच त्यांना मर्यादित ठेवण्यात आले. मात्र स्थायी समितीसह इतर महत्त्वाच्या पदांपासून महिलांना दूरच ठेवण्यात आल्याचे दिसते. हाच कित्ता यंदाही गिरवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोणाचे कुठे वर्चस्व ?
ठाणे महपालिकेत माजी महापौर नरेश म्हस्के, राम रेपाळे, हनुमंत जगदाळे, नजीब मुल्ला, संजय भोईर, नरेश मणेरा, नारायण पवार, मिलिंद पाटणकर, संजय वाघुले या सर्वपक्षीय नगरसेवकांचा दबदबा आहे. यातील बहुतेकांच्या प्रभागामध्ये दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. – प्रभाग क्रमांक ११, १२, १३, १४ या प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन नगरसेविका निवडणून येणार आहे. लोकमान्य नगर प्रभाग समितीमधील हे पॅनल आहेत. येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे या प्रभागांमध्ये सर्वाधिक नगरसेविका निवडून येणार असले तरी चलती जगदाळे यांचीच असणार आहे.
प्रभाग क्रमांक ९ मध्येही दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत. येथून माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. प्रभाग क्रमांक २१मधून नारायण पवार हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत..प्रभाग क्रमांक २७ मधून माजी महापौर नरेश म्हस्के निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर दोन नगरसेविका असलेल्या प्रभाग क्रमांक ३८ मधून माजी विरोधी पक्षेनेते शानू पठाण निवडणूक लढवणार आहेत. प्रभाग क्रमांक १ मध्ये नरेश मणेरा, प्रभाग २ मध्ये मनोहर डुंबरे हे दिग्गज असून या प्रभागांमध्येही दोन महिला नगरसेविका निवडून येणार आहेत.