तीन पुलांमुळे भिवंडीतील पाच गावांचा ठाण्यात समावेश होण्याचा मार्ग मोकळा
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या सीमा वाढवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोलशेत खाडी पुलावर तीन पूल बांधून खारबाव परिसरातील पाच गावांचा संपर्क वाढवला जाणार आहे. या कामाच्या निविदा निघाल्याने पाच गावांचा ठाणे महापालिकेत समावेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भिवंडी तालुक्यातील पोयेगाव, खारबाव, नागले, मालोडी आणि खार्डी या पाच गावांचा ठाणे महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय २०१२ साली घेण्यात आला होता, परंतु या गावांना जोडणारा उल्हास नदीवरील पूल बांधण्यासाठी महापालिकेच्या तिजोरीत पुरेसा निधी नव्हता. एमएमआरडीएने देखील त्यावेळी निधी देण्यास असमर्थता दर्शवली होती, त्यामुळे मागील १० वर्षे या गावांचा समावेश होऊ शकला नाही. परिणामीठाणे महापालिकेच्या सीमा देखील वाढल्या नाहीत.
काल राज्य सरकारने ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सुमारे दोन हजार दोनशे कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामध्ये गायमुख ते पोयेगाव, कासारवडवली ते खारबाव आणि कोलशेत ते काल्हेर असे तीन उड्डाणपूल उल्हास नदीवर बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी एक हजार १६२ कोटींची निविदा काढण्यात आली आहे. या पुलांमुळे कोलशेत-कशेळीमार्गे वळसा घालून खारबावला जावे लागत होते, तो वळसा कमी होणार आहे. तसेच अगदी कमी वेळात खारबाव येथे ठाण्यातून पोहचणे शक्य होणार आहे तसेच या गावांचा समावेश झाल्यास त्यांचा विकास देखिल होणार आहे.
सीमा वाढविण्यासाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. त्याला काही काळ जाणार असल्याचे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘ठाणेवैभव’ला सांगितले.