ठामपाचा बंब बोंबलला बादली आली कामाला

* आग विझेपर्यंत घर बेचिराख
* अग्निशमन दलाचे पितळ उघडे

ठाणे : पूर्व ठाण्यातील आनंदनगर येथे घराला लागलेली आग चक्क बादलीने पाणी टाकून विझविण्यात आली, मात्र तोपर्यंत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या बंबाचा काय उपयोग अशी भावना या भागातील नागरिकांची झाली आहे.

आनंदनगर येथिल कामगार कल्याण भागातील अनिकेत दळवी यांच्या घराला दुपारी ४ वाजता आग लागली होती. स्थानिक माजी नगरसेवक नरेश म्हस्के यांनी अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली होती, परंतु अग्निशमन दलाचा बंब बंद असल्याने फक्त पाण्याचा टँकर आग लागली त्या ठिकाणी पोहचला होता. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी टँकरचे पाणी बादलीने भरून आग विझवली, मात्र तोपर्यंत खूप वेळ झाला होता. यात श्री.दळवी यांचे घर पूर्णपणे बेचिराख झाले. कपडालत्ता, भांडीकुंडी, धान्य आणि घरातील इतर साहित्य या आगीत जळून खाक झाले. बंब वेळेवर आला असता तर पाण्याच्या माऱ्याने आग लवकर विझून गरीब कुटुंबाचे कमी प्रमाणात नुकसान झाले असते, अशी प्रतिक्रिया या भागातील नागरिकांनी दिली.

दरम्यान संध्याकाळी कोपरी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी बंद असलेली आग विझविण्याची गाडी दुरुस्तीकरिता गॅरेजला पाठविल्याचे एका अग्निशमन दलाच्या जवानाने सांगितले. दरम्यान कोपरी अग्निशमन दलाचे प्रमुख घटनास्थळी साध्या ड्रेसमध्ये आल्याने त्यांना तेथे कोणीही ओळखले नाही. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आग प्रतिबंधक पोशाख घालून येणे आवश्यक असताना अधिकारी साध्या पोशाखात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आग मोठी असती तर त्यांनी काय केले असते, अशी देखिल चर्चा येथे सुरु होती. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.