प्रशिक्षणार्थींना सर्व सुविधा देणारी पहिली महापालिका
ठाणे : भारतीय प्रशासकीय सेवेचे प्रशिक्षण देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या सी.डी.देशमुख या संस्थेच्या माध्यमातून यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय केली जाणार आहे. अशा प्रकारची सुविधा देणारी देशातील पहिली संस्था निर्माण करण्याचा मान ठाणे महापालिकेला मिळणार आहे.
आमदार प्रताप सरनाईक यांनी आज महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांना याबाबत माहिती दिली. ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील वर्तकनगर भागात नानासाहेब धर्माधिकारी प्रशासकीय इमारतीमध्ये पालिकेची सी.डी. देशमुख प्रशिक्षण संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून यूपीएससी आणि एमपीएससीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या संस्थेत ठाणे शहरासह राज्याच्या इतर भागातील विद्यार्थी प्रशिक्षणासाठी येत असतात. त्या विध्यार्थ्यांना राहण्याची सोय नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. तशा तक्रारी आ.सरनाईक यांच्याकडे येत होत्या, त्यामुळे या संस्थेची स्वतंत्र इमारत असावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सरनाईक यांच्या मतदारसंघात असलेल्या वसंत विहार भागातील महापालिकेच्या राखीव भूखंडावर ही इमारत उभारावी असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे देण्यात आला होता. त्याची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे. त्यासाठी २५ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे
ही संस्था ठाण्याचे वैभव असल्याने महापालिका याचा खर्च करेल असे आयुक्तांनी आश्वासन दिले आहे. परंतु पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने हा खर्च राज्य शासनाने करावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे साकडे घातले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशातील ही पहिली संस्था ठरणार असल्याने येत्या ९ फेब्रुवारीला त्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले.
ही इमारत सात ते नऊ मजल्यांची असणार आहे, त्यामध्ये १०० विद्यार्थींनी आणि १०० विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह देखील असणार आहे. याशिवाय या ठिकाणी वातानुकुलीत वर्ग, संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय, तसेच अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने खेळाचे मैदान इनडोअर खेळ आणि व्यायामशाळा उभारली जाणार आहे. वाचनालय, प्रशस्त हॉल व इतर सोयीसुविधा देखील उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याची माहिती आ. सरनाईक यांनी दिली.