कोलबाड झाड दुर्घटनेला जबाबदार कोण?
ठाणे : सोसायटीच्या जागेत वृक्षतोड झाल्यास वृक्ष प्राधिकरण गुन्हा दाखल करते, मग खर्च वसूल करून धोकादायक वृक्षांची छाटणी प्रशासन का करत नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोलबाडमध्ये वृक्ष कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर त्याची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न प्राधिकरणाने केल्याने हा प्रश्न आणखी ऐरणीवर आला आहे.
कोलबाड येथील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपावर पिंपळाचे मोठे झाड पडून राजश्री वालावलकर या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली. यात अन्य चार जणही जखमी झाले होते. या घटनेची दखल घेऊन खा. राजन विचारे यांनी मृत महिलेला ३० लाखांची मदत देण्याची मागणी शासनाकडे केली असून या घटनेला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मात्र कारवाई करणे दूरच, या प्रकरणी प्रशासनाने हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. वृक्षप्राधिकरण विभागाने पालिका आयुक्तांसमोर वस्तुस्थिती दर्शक अहवाल ठेवला असून यामध्ये एप्रिल महिन्यातच पिंपळाच्या फांद्या छाटण्याची परवानगी संबंधित सोसायटीला देण्यात आली असल्याचे नमूद केले आहे. मात्र सुमारे पाच मजली उंच असलेल्या झाडाच्या फांद्या छाटण्याची यंत्रणा संबंधित सोसायटीकडे नसल्याचे कळल्यानंतरही यावर या विभागाने कोणत्याच प्रकारची कारवाई केलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
झाडाच्या फांद्या वेळेत न छाटल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप सुरुवातीपासूनच स्थानिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे कोलबाड दुर्घटनेत जे झाड महिलेच्या अंगावर पडले ते झाड पाच ते सहा मजल्यापर्यंत उंच होते. तसेच ३५ ते ४० वर्ष जुने होते. एवढ्या मोठ्या झाडाच्या फांद्या छाटण्याची कोणतीच यंत्रणा तब्बल चार हजार कोटी रुपयांचे बजेट असलेल्या महापालिकेकडेच नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कंत्राट देऊनच मोठ्या वृक्षांच्या फांद्या छाटण्याची कामे केली जात असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. जर महापालिकेकडेच ही यंत्रणा नसेल तर शहरातील सोसायट्यांनी हा प्रश्न कसा सोडवायचा? दुसरीकडे वृक्षप्राधिकरण विभागाला जिथे प्रभाग समितीनिहाय ३० लाखांच्या निधीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी केवळ १० ते १२ लाखांचा निधी मिळत आहे. याशिवाय फांद्या छाटणारे, बिगारी, वाहतूक करण्यासाठी असलेले वाहन यांना फार कमी मोबदला मिळत असल्याने जीव धोक्यात घालून कोणी काम करण्यासही तयार नाहीत.
वर्षभरात सुमारे ७०० सोसायट्यांचे अर्ज
ठाणे शहरातील सोसायट्यांच्या आवारात असलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्याच्या परवानगीसाठी ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे वर्षभरात ६०० ते ७०० अर्ज येतात. ही छाटणी संबंधित सोसायटीलाच करावी लागत असल्याचे या विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.