पहिल्या टप्प्यातील ९५ हजार अर्जांची छाननी पूर्ण
ठाणे : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी अर्ज केलेल्या महिलांच्या, पहिल्या टप्प्यातील ९५ हजार अर्जांची छाननी ठाणे महापालिकेने शनिवार ३ ते सोमवार ५ ऑगस्ट या तीन दिवसांत अहोरात्र काम करून विक्रमी वेळेत पूर्ण केली आहे.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांचे आवश्यक मनुष्यबळ तसेच संपूर्ण तांत्रिक व्यवस्था महापालिका मुख्यालयात सज्ज करण्यात आली होती. शनिवार ते सोमवार असे तीन दिवस दररोज तीन सत्रांमध्ये अखंडीतपणे काम करून जमा झालेल्या सर्व अर्जांची विगतवार ऑनलाईन तपासणी करण्यात आली. त्यासाठी संगणक संचांचे अद्ययावत नेटवर्क तयार करण्यात आले होते.
अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (समाजविकास) अनघा कदम, समाज विकास अधिकारी दशरथ वाघमारे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप यांनी प्रत्येक सत्रात होणाऱ्या अर्ज पडताळणीचे नियोजन केले. त्यात सूत्रबद्धता आणून जलद गतीने काम मार्गी लावले.
राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठाणे महापालिकेने प्रभाग समितीनिहाय १३७ मदत केंद्रे सुरू केली आहेत. वागळे इस्टेट प्रभाग समिती कार्यालयात त्यासाठी एक वॉर रुमही तयार करण्यात आली आहे. या सर्व मदत केंद्रांवर आलेले अर्ज तसेच ऑनलाईन प्राप्त झालेले अर्ज यांची ऑनलाइन पद्धतीने पात्रता निश्चिती करण्यात आली. त्यात, ठाणे तालुक्यातील ठाणे, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर या महापालिका हद्दीतील अर्जांचा समावेश होता.
ठाणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कामाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त अनघा कदम यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचे कौतुक केले. तसेच, पहिल्या टप्प्यात ज्या पद्धतीने सगळ्यांनी काम केले तोच उत्साह दुसऱ्या टप्प्यातही कायम ठेवून या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थी महिलेपर्यंत पोहोचेल, याची दक्षता घ्यावी, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.