गतवर्षीच्या तुलनेत मालमत्ता करातून १०२ कोटींचे अधिक उत्पन्न
ठाणे: ठाणे महापालिकेवर धनलक्ष्मी प्रसन्न झाली असून मालमत्ता कर विभागाने मागिल वर्षापेक्षा यावर्षी आजपर्यंत १०२ कोटीपेक्षा जास्त कर वसुल केला आहे. यावर्षी महापालिकेच्या तिजोरीत ७०५ कोटी इतका मालमत्ता कर जमा झाला आहे.
महापालिकेच्या इतर विभागाने वसुलीमध्ये मान टाकली असताना मालमत्ता कर विभाग ठामपाचा आर्थिक आधार बनला आहे. मागिल वर्षी आजच्या दिवशी मालमत्ता कर विभागाने ६०४ कोटी इतकी घरपट्टी वसुल केली होती, यावर्षी मात्र ७०५ कोटी इतकी वसुली केली आहे. ही वसुली मागिल ३१ मार्च रोजी झालेल्या वसुलीपेक्षाही जास्त आहे.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मालमत्ता कर विभागाला ८०० कोटी इतक्या वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. त्या दिशेने मालमत्ता कर विभागाचे कर्मचारी-अधिकारी घोडदौड करत आहेत. मालमत्ता कर विभागाचे अधिकारी-कर्मचारी मागिल अनेक दिवस सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात येऊन घरपट्टी वसुलीचे काम करत आहेत. थकबाकीदार ग्राहकांना नोटीस, त्यांच्या मालमत्ता जप्त करणे अशा कारवाया करत आहेत, त्यामुळे अनेक ग्राहक मालमत्ता कर भरत आहेत तर काही प्रामाणिक मालमत्ताधारक हे वेळेच्या आधीच कर जमा करून आपले कर्तव्य बजावत आहेत, त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत वर्षभर लक्ष्मी वास करत असून ठाणे शहरातील नागरी सुविधांची कामे केली जात आहेत.
ठाणे शहरातील सुज्ञ मालमता धारकांनी वेळेवर कर भरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त श्री.राव यांनी केले आहे जे थकबाकीदार वेळेत कर भरणा करणार नाहीत, त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी, असे आदेश महापालिका आयुक्त श्री.राव यांनी मालमत्ता कर विभागाला दिले आहेत.
मालमत्ता कर विभागाचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाचे कर्मचारी मेहनत घेत आहेत.