ठाणे: ठाणे महापालिकेने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये ८१० कोटी रुपये इतका विक्रमी मालमत्ता कर संकलित केला आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता ८५० कोटी रुपये एवढा मालमत्ता कर संकलनासाठी अर्थसंकल्पीय उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टाच्या ९५ टक्के एवढा मालमत्ता कर संकलीत करण्यात महापालिकेस यश मिळाले आहे.
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये ७०२ कोटी रुपये एवढ्या मालमत्ताकराचे संकलन झाले होते. मागील वर्षाच्या तुलनेत ठाणे महापालिकेने १०८ कोटी रुपये इतका अधिक मालमत्ता कर वसूल केला आहे.
ठाणे महापालिकेने करदात्यांना कर भरणे सुलभ व्हावे यासाठी तंत्रज्ञानावर आधारित पर्याय उपलब्ध करुन दिले. त्यामुळे ८८.४८टक्के मालमत्ता कर हा डिजीटल व इतर माध्यमातून संकलित झाला आहे. त्यामुळे शासनाने डिजिटल इंडिया या उपक्रमासही महापालिकेच्या कृतीने सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
नौपाडा-कोपरी प्रभागात १००.०५ कोटी, वागळे इस्टेट ३१.५० कोटी, लोकमान्य-सावरकर नगर ३३.६७ कोटी, वर्तकनगर १२२.२० कोटी, माजिवडा-मानपाडा २४६.१४ कोटी, उथळसर ५१.०७ कोटी, कळवा २९.०५ कोटी, मुंब्रा ३०.६७ कोटी, दिवा ३७.८५ कोटी आणि मुख्यालय व इतर मार्फत १२७.८० कोटी मालमत्ता कर संकलन करण्यात आले.
एकूण जमा झालेल्या ८१० कोटी मालमत्ता करात धनादेशद्वारे ४१.८२टक्के, ऑनलाईन ३०.९७टक्के, धनाकर्ष (डीडी) १५.५१टक्के, एटीएम कम डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड ०.१८ टक्के आणि रोखीने ११.५२टक्के भरणा समाविष्ट आहे.