* उपवन परिसराचा विकासाचा मार्ग मोकळा
* आ. प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
ठाणे: ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील शिवाईनगर भागातील उपवन क्षेत्रामध्ये असलेली दहा एकर जमीन जिल्हा प्रशासनाने पालिकेला मोफत दिली आहे. यामुळे येथील रस्ते, उद्याने आदी विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे.
महानगरपालिकेच्या डी.पी.नुसार उद्यानासाठी आरक्षित असलेली सुमारे आठ एकर तसेच रस्ता व इतर गोष्टींसाठी आरक्षित असलेली सुमारे दोन एकर जमिन महसुल खात्याकडे होती. ही आरक्षित जमिन जिल्हाधिकाऱ्यांनी ठाणे महानपालिकेकडे वर्ग करावी, यासाठी आमदार प्रताप सरनाईक पाठपुरावा करीत होते.
या प्रक्रियेला यश प्रप्त झाले असून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी २३ जून २०२३ रोजी पत्र काढून महसुल खात्याच्या नावावर असलेली जमिन ठाणे महापालिकेच्या ताब्यात दिली आहे. त्यापैकी सुमारे २९२३६.३५ चौ.मी. जमिन बगीचा आरक्षण क्रं. ०६ करिता, सुमारे ३६५८.८२ चौ.मी. जमिन २० मी. रस्ता रूंदीकरणासाठी, सुमारे २५६५.६१ चौ.मी. जमिन ३० मी. रूंद एच.सी.एम.टी.आर. मार्गासाठी, सुमारे २०५९.२८ चौ.मी. जमिन पोखरण लेक इंडस्ट्री झोनऐवजी बगीचा आरक्षण क्रं. ०६ करिता आरक्षित असलेल्या ह्या सर्व जमिनी ठाणे महापालिकेच्या नावे झाल्यामुळे आता या परिसराचा महानगरपालिकेच्या माध्यमातून विकास करणे सुलभ झाले आहे.
या मोकळ्या जमिनीवर एका आदिवासी व्यक्तीने आपली जागा असल्याचे भासवून त्या ठिकाणी फुटबॉल टर्फ तसेच इतर व्यावसायिक काम चालू केले होते. तसेच स्थानिक खेळाडूंना तेथे क्रिकेट खेळण्यासाठी सुध्दा गुंडगिरी करून बंदी केली होती. त्यानंतर श्री. सरनाईक यांनी पुढाकार घेऊन, या शासकिय जमिनीवर असलेले अतिक्रमण महापालिकेच्या माध्यमातून काढून टाकून स्थानिक खेळाडूंना हे मैदान खेळण्यासाठी मोकळे केले होते.
उपवन तलावाशेजारी गणपती मंदिराच्या बाजूला श्री. सरनाईक यांनी राज्य शासनाकडून धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने जिमखाना मंजूर केला आहे. त्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खात्याच्या माध्यमातून ह्या आरक्षित भुखंडाला चारही बाजूंनी संरक्षक भिंत, प्रवेशद्वार, रस्ता तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने निर्माण करण्यात येणाऱ्या जिमखान्यासाठी ५० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे उपवन तसेच शिवाईनगर येथील आजूबाजूच्या परिसरातील विकासाला चालना मिळणार असल्याने स्थानिक नागरिकांनी श्री. सरनाईक यांचे आभार मानले.