ठामपा शिक्षण विभागाचे ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सुरू

ठाणे : ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन शाळा क्रमांक ४४, वर्तक नगर येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवार, ११ डिसेंबर रोजी करण्यात आले. या प्रदर्शनात, ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या एकूण ९३ प्राथमिक शाळा, २१ माध्यमिक शाळा, आठ खाजगी प्राथमिक व आठ खाजगी माध्यमिक अशा एकूण १३० शाळांचा सहभाग आहे.

प्रदर्शनाचे उद्गघाटन उपायुक्त (शिक्षण) सचिन सांगळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी, शिक्षणाधिकारी कमलकांत म्हेत्रे, प्रमुख वक्ते प्रा. सलील सावरकर, गट अधिकारी संगीता बामणे आदी उपस्थित होते. उद्घाटन समारंभानंतर, सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगांचे व प्रकल्पांचे अवलोकन करून वि‌द्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.

आपले सगळे जीवन हे विज्ञानावर अवलंबून असून विज्ञानाची भूमिका अतिशय मोलाची आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागेल आणि त्यांना त्यास अधिक रस निर्माण होईल, असे प्रतिपादन उपायुक्त सांगळे यांनी केले. तर, आपण विज्ञानाची सृष्टी घेतली असून आता विज्ञानाची दृष्टीही घेण्याची आवश्यकता शिक्षणाधिकारी कमलकांत म्हेत्रे यांनी व्यक्त केली. चांदीबाई कॉलेज, उल्हासनगर येथील प्राध्यापक सलील सावरकर यांनी आपल्या वक्तृत्वातून श्र‌द्धा आणि विज्ञान यांची सांगड घालणारा प्रसंग कथन करीत, विज्ञानाची महती विशद केली. या कार्यक्रमात, गेल्या वर्षी विज्ञानमंच उपक्रमांतर्गत इस्रो येथे शैक्षणिक सहलीसाठी गेलेल्या वि‌द्यार्थ्यांपैकी दोन वि‌द्यार्थिनींनी अनुभव कथन केले. प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुनील फापाळे यांनी या वि‌द्यार्थिनीना बक्षीस जाहीर केले. तसेच, मान्यवरांच्या हस्ते ते त्या विद्यार्थिनीना प्रदान करण्यात आले.

गुरूवार, १२ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनात सर्व शाळांमधील वि‌द्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. त्यांच्या प्रयोगांचे व प्रकल्पांचे परीक्षण परीक्षक करणार आहेत. उत्कृष्ट प्रयोगांना ठाणे महापालिका शिक्षण विभागाकडून बक्षीसे दिली जाणार आहेत. उद्गघाटन कार्यक्रमात ठाणे मनपा शाळा क्रमांक ४४ च्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. गट क्रमांक ८च्या गटप्रमुख अनघा पालांडे यांनी आभार प्रदर्शन केले. तर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाणे मनपा शाळा क्रमांक १२०चे शिक्षक सुरेश पाटील यांनी केले.