ठामपाची चार दिवसांत ८.७९ कोटींची कमाई

ठाणे: गेल्या आर्थिक वर्षात ७२२ कोटी रुपयांचा विक्रमी मालमत्ता कर गोळा केल्यानंतर, ठाणे महापालिकेने नवीन आर्थिक वर्षात पहिल्या चार दिवसात ८७५५ मालमत्ताधारकांनी ८.७९ कोटी रुपये एवढ्या मालमत्ता कराचा ऑनलाईन पद्धतीने भरणा केला.
आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मालमत्ताधारकांना ऑनलाइन देयके आणि ती भरण्याची सुविधा प्रशासनाने उपलब्ध केली. अशी योजना महापालिकेच्या इतिहासात प्रथमच करण्यात आली. तसे करणारी ठाणे महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे.
ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागास यावर्षी सुमारे ८०० कोटी रुपयांच्या वसुलीचे लक्ष्य आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहे. नवीन आर्थिक वर्षात या विभागाने पेपरलेस कारभारावर भर देण्याचे निश्चित केले आहे. त्याच्या अनुषंगाने मागचे (२०२२-२३) आर्थिक वर्ष संपत नाही, तोच १ एप्रिल रोजी पहाटेपासून मालमत्ता विभागाची देयकांबद्दलचे एसएमएस मालमत्ता धारकांच्या मोबाईलवर पाठवून देण्यात आले. चालू वर्षाचे बिल आणि बिल भरण्यासाठी उपलब्ध असलेल्या मार्गाची माहिती आतापर्यंत तीन लाख ४० हजार मालमत्ताधारकांना पाठवण्यात आली.
यापूर्वी, मालमत्ता धारकांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत बिले पाठवली जात होती. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी देयक ऑनलाईन भरण्याची लिंक एसएमएसद्वारे उपलब्ध झाली. त्यामुळे त्याच दिवसापासून करदात्यांनी मालमत्ता कर भरण्यास सुरूवात केली. मालमत्ता कर भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नसल्याने नागरिकांनीही या योजनेस भरघोस सहकार्य केले. पहिल्या दिवशी १.९५ कोटी, दुसऱ्या दिवशी ३.०४ कोटी, तिसऱ्या दिवशी २.२० कोटी, चौथ्या दिवशी १.६० कोटी रुपयांच्या मालमत्ता कराचा भरणा झाला आहे.
करदाते त्यांच्या देयकाची संगणकीय प्रत propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे अथवा प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्रावरुन उपलब्ध करुन घेवू शकतील. तसेच या लिंकद्वारे इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच GooglePay, PhonePe, PayTm व BHIM App याद्वारे करदाते ऑनलाईन पध्दतीने त्यांचा मालमत्ता कर जमा करू शकतात.
तारीख मालमत्ताधारक रक्कम
१/४/२३ २०९७ १.९५ कोटी
२/४/२३ २९६४ ३.०४ कोटी
३/४/२३ २२२८ २.२० कोटी
४/४/२३ १४६६ १.६० कोटी
एकूण ८७५५ ८.७९ कोटी