वाट चुकलेल्या पदाधिकाऱ्यांना ठाकरे-शरद पवार गटाची हाक

ठाणे जिल्ह्यात उमेदवारांसाठी पक्षांची दमछाक

ठाणे: राज्यात महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांना अनुकूल वातावरण असल्याचे बोलले जात असले तरी ठाणे जिल्ह्यात मात्र या पक्षांची उमेदवार निवडीसाठी दमछाक होत आहे. त्यामुळे त्यांनी गतकाळात पक्ष सोडून गेलेल्या पदाधिकाऱ्यांना परत येण्याची साद घालण्यास सुरुवात केली आहे.

ठाणे जिल्ह्यात एकूण १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१९ साली शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी लढत झाली. यामध्ये त्याकाळी एकसंघ असलेल्या शिवसेनेचे पाच आमदार निवडून आले. भाजपचे आठ आमदार निवडून आले. राष्ट्रवादी पक्षाचे दोन तर मनसे आणि एमआयएम पक्षाचा प्रत्येकी एक आमदार निवडून आला. एका अपक्ष उमेदवाराने भाजपला समर्थन दिले. त्यामुळे भाजप आमदारांची संख्या नऊवर झेपावली. राज्यात युतीचे सरकार येईल अशी परिस्थिती असताना अचानक पहिला राजकीय भुकंप झाला आणि शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अशी महाविकास आघाडीचे सरकार आले. या सरकारमध्ये ठाणेकर असलेल्या एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री आणि पालकमंत्री झाले. दुसरीकडे राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनाही गृहनिर्माण मंत्रीपद मिळाले. पण २०२२ मध्ये शिवसेनेचे १६ आमदार घेऊन एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट तयार करून भाजपला पाठिंबा दिला. यावेळी शिंदे यांच्या गटात शिवसेनेच्या आमदारांची आणखी भर पडली आणि त्यातून महाविकास आघाडीचे सरकार गेले व महायुतीचे सरकार आले.

महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने उद्धव ठाकरे यांच्याकडील आमदार आणि पदाधिकारी आपल्याकडे खेचण्यात शिंदे यांना यश आले. अशा पदाधिकाऱ्यांना हेरून त्यांना पुन्हा स्वगृही आणण्याच्या हालचाली ठाकरे गटात वाढल्या आहेत.

शिवसेना फुटल्यानंतर राष्ट्रवादीतही उभी फूट पडली. शरद पवार यांना सोडून अनेक आमदारांनी अजित पवार यांना साथ दिली. हा गट देखील महायुती सरकारमध्ये सामील झाल्याने शरद पवार गटातील अनेक पदाधिकारी अजित पवार यांच्याकडे गेले. त्यामुळे शरद पवार गटात उमेदवारीसाठी सध्या तारेवरची कसरत सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला ठाण्यात पराभव पत्करावा लागला. पक्षवाढीसाठी खर्च करणारे एखाद दोन सोडले तर ठाकरे गटाकडे पदाधिकारी नाहीत. अशा परिस्थितीत ठाणे जिल्ह्यात उमेदवारी देण्याची तारेवरची कसरत ठाकरे गटाला करावी लागणार आहे. डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचे युवासेनेचे दिपेश म्हात्रे काही दिवसांपूर्वीच स्वगृही म्हणजे शिवसेना ठाकरे गटात आले आहेत. नवी मुंबईत शिवसेनेचे विजय नाहटा यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटाचे दुसरे एक नेते विजय चौगुले यांच्या नाराजीचा पुरेपूर लाभ घेण्याच्या तयारीत ठाकरे गट आहे. चौगुले यांनी पूर्वी शिवसेनेतून लोकसभेसाठी निवडणूक लढवली होती. २०१९ साली ते विधानसभेसाठी इच्छूक होते. पण युतीच्या जागावाटपात भाजपला ती सोडण्यात आली. आता शिंदे गटाकडे ही जागा न आल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी चौगुले यांची आहे. यामुळे हा मोठा मासा गळाला लागला तर ठाकरे गटाला त्याचा फायदाच होणार आहे.

मुरबाडमध्ये भाजपची जागा हिसकावण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट दोघेही प्रयत्न करत आहेत. त्यासाठी स्वपक्षातील उमेदवारांच्या चाचपणीसह शिंदे गटाचे पदाधिकार्‍यांना गळ घातली जात आहे. त्यासाठी बदलापूरच्या माजी नगराध्यक्षांपासून ते पदाधिकार्‍यांना फोन केले जात आहेत. शिंदे गटात नाखूश असलेल्या पदाधिकार्‍यांशीही संपर्क वाढला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबई, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाने लक्ष केंद्रीत केले आहे. केवळ शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गटच नाही तर भाजपच्या अंतर्गत नाराजीचा फायदाही होणार आहे. दरम्यान या सर्व घडामोडीमध्ये काँग्रेसची हालचाल कमी पडत असून जिल्ह्यात काँग्रेस जवळपास हद्दपार झाली आहे.