ठाकरे गटाचे शिलेदार नरेश मणेरा यांचा राजकीय संन्यास

ठाणे: ठाणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी माजी नगरसेवकांसह हौशी इच्छूकांनी देव पाण्यात घालून ठेवले असताना शिवसेना ठाकरे गटाचे शिलेदार माजी उपमहापौर नरेश मणेरा यांनी राजकीय सन्यास घेतला आहे.

ठाण्यात पक्षाची अधोगती होत असून दुसर्‍या पक्षात जाऊन निष्ठा गमावण्यापेक्षा यापुढे कोणतीच निवडणूक न लढवण्याचा निर्णय नरेश मणेरा यांनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शिवसेनेते दोन गट झाल्यानंतर हातावर मोजण्या इतकेच माजी नगरसेवक ठाकरे गटात टिकून राहिले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपला किल्ला लढवत ठाण्यात ठाकरे गट जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केला होता. त्यामध्ये माजी उपमहापौर नरेश मणेरा यांचे नाव सन्मानाने घेतले जात होते. घोडबंदरच्या आनंदनगर भागात त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. प्रभाग क्रमांक एकमधून सलग नगरसेवक म्हणून ते या प्रभागातून निवडून येत होते. शिंदे गटातील काही नगरसेवकांना पुन्हा ठाकरे गटाकडे त्यांनी वळवले होते. त्यांनतर विधानसभा निवडणुकही त्यांनी लढवली. त्यात त्यांना अपयश आले होते. तेव्हापासूनच मणेरा पक्ष आणि राजकारणापसून अलिप्त राहिले होते.

आता महापालिका निवडणुकीत मणेरा परत कमबॅक करतील अशी अपेक्षा होती. शिवसेना ठाकरे गटातून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. पण यापुढे निवडणूकच लढवणार नाही अशी भूमिका त्यांनी ‘ठाणेवैभव’कडे व्यक्त केली आहे.

शिवसेना शिंदे गटाकडे माजी नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांची फौज असताना ठाकरे गटाचे आतापर्यंत साथ देणारे शिलेदारही साथ सोडून जात असल्यामुळे हा मोठा धक्का मानला जात आहे.