उद्योग म्हणजे केवळ नफा नाही तर मोठी सामाजिक जबाबदारी

एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर्सचे संचालक सुहास मेहता यांचे प्रतिपादन

वावीकर आय इन्स्टिट्यूट आणि ‘ठाणेवैभव’ यांचा संयुक्त उपक्रम

ठाणे: उद्योग सुरू करणे म्हणजे केवळ पैसा कमावणे नव्हे, तर समाजाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारी मूल्यनिर्मिती करणे होय, असा प्रेरणादायी संदेश एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर्सचे संचालक सुहास मेहता यांनी विद्यार्थ्यांना दिला.

वावीकर आय इन्स्टिट्यूट आणि ‘ठाणेवैभव’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दृष्टि २०२५’ या भव्य करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात सुहास मेहता बोलत होते. श्री. मेहता यांनी आपल्या आयुष्याची कहाणी विद्यार्थ्यांसमोर उलगडली. आमच्या काळात डॉक्टर किंवा इंजिनियर हेच करिअरचे पर्याय मानले जात. मला सीए व्हायचे होते; मात्र कौटुंबिक अपेक्षांमुळे इंजिनियरिंगकडे वळावे लागले. महाडसारख्या छोट्या गावातून, मराठी माध्यमातून शिक्षण घेत भारतातच काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय तेव्हा अनेकांना चुकीचा वाटला; पण आज तोच माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला, असे मेहता म्हणाले.

आजच्या बदलत्या जगात संधी अमर्याद असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आज एखादी कल्पना सकाळी जन्माला येते आणि संध्याकाळपर्यंत स्टार्टअपमध्ये रूपांतरित होते. करिअर म्हणजे स्पर्धा नाही, तर स्वतःला शोधण्याचा आणि घडवण्याचा प्रवास आहे. आपल्या आवडी, मूल्ये आणि स्वभाव यांचा मेळ म्हणजे योग्य करिअर, असे मेहता यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना केवळ अभ्यासक्रम, पॅकेज किंवा ट्रेंड पाहू नये, तर ज्यामुळे आपले सर्वोत्तम व्यक्तिमत्त्व उजळून निघेल असा पर्याय निवडावा, असा सल्ला त्यांनी दिला. येत्या काळात एआय एथिक्स, सायबर सिक्युरिटी, इन्फ्रास्ट्रक्चर, डेटा आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट या क्षेत्रांत मोठ्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले.

उद्योजकतेचा खरा अर्थ सांगताना मेहता म्हणाले, “उद्योग उभारणे म्हणजे नफा कमावण्याची यंत्रणा नाही, तर समाजासाठी उपयुक्त असे मूल्य निर्माण करणे आहे. जेव्हा समाजाला काहीतरी दिले जाते, तेव्हाच यश टिकाऊ ठरते. यश म्हणजे आपण किती कमावले यापेक्षा आपण समाजासाठी काय उभे केले हे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात कार्यरत असूनही सातत्याने शिकण्याची तयारी ठेवणे किती गरजेचे आहे, यावरही त्यांनी भर दिला. नवनवीन शिकण्याची वृत्तीच माणसाला काळाबरोबर पुढे नेत असते. दुसऱ्याला जे शक्य आहे, ते आपल्यालाही नक्की शक्य आहे, हा विश्वासच यशाची पहिली पायरी आहे, असे ते म्हणाले. त्यांनी स्वच्छता, प्रामाणिकपणा, करुणा आणि नवोन्मेष या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. यश म्हणजे एखादे पॅकेज किंवा पद नव्हे, तर सततची प्रगती आणि अंतःकरणातील शांतता आहे. खरी स्पर्धा इतरांशी नसून स्वतःशी असते. मूल्यांशी प्रामाणिक राहून केलेले कामच खरे समाधान देते,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

‘दृष्टि २०२५’ हा करिअर मार्गदर्शन कार्यक्रम ६ व ७ डिसेंबर रोजी माजिवडा, ठाणे पश्चिम येथील वावीकर आय इन्स्टिट्यूटच्या सुसज्ज ऑडिटोरियममध्ये उत्साहात पार पडला. यावेळी वावीकर आय इन्स्टिट्यूटचे डॉ. चंद्रशेखर वावीकर, डॉ. वैशाली वावीकर, डॉ. गार्गी वावीकर, सरस्वती विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा मीरा कोर्डे, ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ आणि व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.