शरद पवार गटाच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत भरले अर्ज

ठाणे : हजारो मतदारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार प्रकाश पाटील, वर्षा मोरे, दिपा गावंड आणि प्रकाश बेर्डे यांनी आज प्रभाग क्रमांक 25 आणि प्रभाग 23 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सुमारे 10 ते 12 हजार लोक सहभागी झाले होते. या प्रसंगी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी वाजवा तुतारी… गाडा गद्दारी”, असा नारा दिला.

आज सकाळी ११च्या सुमारास जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, ठाणे महिलाध्यक्ष सुजाता घाग यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारांनी कळवा पूर्व येथून प्रचंड रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रॅलींमध्ये डाॅ.जितेंद्र आव्हाड हेदेखील सहभागी झाले होते. या प्रसंगी डाॅ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अर्ज दाखल करताना उसळलेला जनसमुदाय पाहता, लोकांना विकास हवा आहे, हेच स्पष्ट होत आहे. कळव्यातील मतदार हे विकासाला मतदान करणार असल्याचे दिसत आहे. कळवा पूर्वेतील झोपड्यांवर जेव्हा कारवाई करण्यात येणार होती. तेव्हा आपणच चार तास रेल रोको करून झोपड्या वाचविल्या होत्या. कधीकाळी आठ ते दहा हजारात विकल्या जाणाऱ्या झोपड्या आता पंधरा ते वीस लाखांत विकल्या जात आहेत. याला कारण कळवा विकसित होत आहे. येथील पाण्याची, विजेची समस्या मार्गी लागली आहे. अगदी डोंगरपट्ट्यातील गल्ल्यादेखील काँक्रिटीच्या केल्या आहेत. वाहतूक कोंडीची थोडीफार समस्या असली तरी लवकरच नवे रस्ते तयार करून ती समस्याही मार्गी लावण्यात येणार आहे.