शिंदे गटात करणार प्रवेश
ठाणे : ठाण्यात ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून ठाकरे गटाच्या युवासेनेच्या उप उपजिल्हा प्रमुखासह चार पदाधिकाऱ्यांनी अंतर्गत गटबाजीला कंटाळून सामूहिक राजीनामे दिले आहेत. या सर्वानी थेट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे हे राजीनामे दिले असून यामुळे ठाण्यात ठाकरे गटाच्या युवासेनेची उरली सुरली ताकद देखील आता संपुष्टात आली आहे.
शिवसेनेच्या फुटीनंतर ठाणे हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू झाले आहे. या ठिकाणी शिवसेना आणि ठाकरे गटात अनेकवेळा संघर्ष पाहायला मिळाला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर ठाण्यातील बहुतांश नगरसेवक यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अनेक युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक हे युवासेनेचे सचिव आहेत. त्यांनी ठाण्यात युवासेनेचे मोठे जाळे निर्माण केले आहे. तर ठाकरे गटात युवा सेना फारशी क्रियाशील नव्हती. अशातच आता उरल्या-सुरल्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील थेट आदित्य ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये उपजिल्हा प्रमुख अर्जुन डाभी, शहर अधिकारी किरण जाधव,शाखाप्रमुख अभिषेक शिंदे, समन्वयक दीपक कनोजिया, विभाग अधिकारी राज वर्मा आदींचा यामध्ये समावेश आहे.
आदित्य ठाकरे यांना दिलेल्या पत्रात या पदाधिकाऱ्यांनी त्यांची खंत व्यक्त केली. गेल्या १५ वर्षांत सातत्याने युवा सेनेच्या स्थापनेपासून संघटन मजबूत करण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. प्रसंगी विरोधकांना अंगावर देखील घेतले आहे. परंतु गेल्या दोन वर्षांत काही निवडक पदाधिकारी यांनी सुरु केलेल्या अंतर्गत गटबाजीमुळे आमच्या निष्ठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे आम्ही जड अंतःकरणाने सामूहिकरित्या पदांचा राजीनामा देत असल्याचे या पत्रात नमूद केले आहे.