मविआ’त पहिली ठिणगी पडली!
मुंबई : महाविकास आघाडीचे विधानसभा निवडणुकीचे जागावाटप आता अंतिम टप्प्यात आलेले आहे. जवळपास २६० जागांवर एकमत झालेले असताना महाविकास आघाडीत ठिणगी पडलेली आहे. ठाकरेसेनेच्या नेत्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात थेट भूमिका घेतली आहे. पटोले जागावाटपाच्या चर्चेला उपस्थित असतील, तर आमचे नेते त्या बैठकीला जाणार नाहीत, अशी भूमिका ठाकरेसेनेकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील कुरबुरी समोर आल्या आहेत.
विदर्भातील काही जागांवरुन महाविकास आघाडीत तिढा निर्माण झालेला आहे. या जागांवर काँग्रेस, ठाकरेसेनेकडून दावे करण्यात आलेले आहेत. यावरुन आता ठाकरेसेनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आलेली आहे. नाना पटोलेंविरोधात ठाकरेसेनेच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पटोले यांच्यामुळे जागावाटप अडलेले आहे. त्यांच्याकडून ताठर भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे यापुढे पटोले ज्या बैठकीला असतील, त्या बैठकीला आमचे नेते जाणार नाहीत, अशी भूमिका ठाकरेसेनेकडून घेण्यात आल्याचे वृत्त एका वृत्त वाहिनीने दिले आहे.
विदर्भातील काही जागांवर ठाकरेसेना, काँग्रेसचा दावा आहे. या जागांसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अतिशय आग्रही आहेत. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे. यावरुन पटोले ठाकरेसेनेच्या रडारवर आहेत. ‘महाविकास आघाडीत आता केवळ २० ते २५ जागांचा प्रश्न उरला आहे. पटोलेंमुळे जागावाटपाचा तिढा सुटण्यास वेळ लागत आहे. ते अडून बसल्याने विलंब होत आहे. त्यामुळे पटोलेंची उपस्थिती असलेल्या बैठकांना हजर राहणार नाही’, अशी ठाकरेसेनेची भूमिका आहे.
ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळीच पत्रकारांशी संवाद साधताना पटोलेंवर निशाणा साधला होता. राज्यातील काँग्रेस नेते निर्णय घेण्यात सक्षम नाहीत. त्यांना वारंवार दिल्लीला यादी पाठवावी लागते. मग चर्चा होते. त्यात बराच वेळ गेलेला आहे. आता हाती फार वेळ उरलेला नाही. त्यामुळे आम्ही आता थेट दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी बोलू, असे विधान राऊत यांनी केले होते. त्या विधानाचे पडसाद महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळाले.