ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आंदोलन
ठाणे : ईव्हीएम हटाओ… लोकशाही बचाओ असा नारा देत विधिमंडळ गटनेते डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सामान्य नागरिकांची सुमारे दहा हजार पोस्टकार्ड पाठविली.
डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाता घाग, महिला कार्याध्यक्ष सुरेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. या ठिकाणी कोरे पोस्टकार्ड ठेवून ईव्हीएम घोटाळ्याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच, नागरिकांना आवाहन करून राष्ट्रपतींना पत्र पाठविण्याचे आवाहन करण्यात आले.
‘सामान्य भारतीय नागरिकांच्या मनात ईव्हीएमबाबत संशय अधिकाधिक गडद होत असल्याने भावी काळात लोक मतदानापासून दूर जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे ईव्हीएमवर बंदी आणून जगभरात ज्या पद्धतीने मतपत्रिकेवर मतदान घेतले जात आहे, त्याच पद्धतीने भारतात मतपत्रिकेचा वापर करावा’, अशा आशयाचा मजकूर या पोस्टकार्डवर लिहिण्यात आला होता. ही सर्व पोस्टकार्ड मुख्य डाक कार्यालयातील पत्रपेटीमध्ये डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनीच टाकली.
यावेळी मिलिंद साळवी, अपर्णा साळवी, रचना वैद्य, प्रशासन सरचिटणीस राजेश जगन्नाथ साटम, राजेश कदम, मिलिंद बनकर, राजु चापले, गजानन चौधरी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.