ठाणे जिल्ह्यात १५ दिवसांत दहा हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया

ठाणे : राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियानात राज्य शासनाच्या वतीने विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया पंधरवडा मोहीम राबविण्यात आली. या कार्यक्रमात ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय, खाजगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालय आणि सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून १० हजार ६६३ यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडल्या. जिल्ह्याला दिलेल्या १० हजार लक्ष्यापेक्षा अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्याने राज्यात ठाणे जिल्ह्याचे कौतुक होत आहे.

मोतीबिंदू या आजाराकडे अनेकजण दुर्लक्ष करताना दिसतात. काहींना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नाही. तर काही व्यक्ती आज करू उद्या करू म्हणून टाळाटाळ करतात. मात्र याचा विपरीत परिणाम डोळ्यांवर होण्याची शक्यता अधिक असते. महाराष्ट्र मोतीबिंदू बॅकलॉग मुक्त करण्याच्या दृष्टीने सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. ठाणे जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियानात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र पंधरवडा कार्यक्रम सरकारी खाजगी रुग्णालय आणि सेवाभावी संस्थांनी मिळून राबवला. यामध्ये १०,६६३ मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा नेत्र शल्य चिकीत्सक डॉ. प्रसन्नकुमार देशमुख यांनी दिली.

राज्यात सर्वत्र १९ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबवलं गेलं. ठाणे जिल्ह्यात या अभियानात १० हजाराचे लक्ष्य दिले होते. परंतु लक्षापेक्षा अधिक शस्त्रक्रिया ठाणे जिल्ह्यात पार पडल्या आहेत.

ठाणे सिव्हील रुग्णालयातील नेत्र विभागात मोतीबिंदू सोबत डोळ्यांच्या इतर शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जात असतात. नेत्र चिकित्सा करण्यासाठी अद्यावत मशीन असून, खाजगी रुग्णालयात होणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जात असल्याचे नेत्र सर्जन डॉ. शुभांगी अंबाडेकर म्हणाल्या.

राज्यभरात ह्या मोहिमेत एक लक्ष मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे उद्गिष्ट असताना एक लाख ८,९३७ एवढ्या मोतीबिंदू शत्रक्रिया पार पडल्या. मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र या अभियानात ठाणे जिल्ह्यात झालेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया कामगिरीचे शासन स्तरावर कौतुक होत आहे. डोळ्यांचा मोतीबिंदू रोखायचा झाल्यास नियमित डोळ्यांची तपासणी करावी. धूम्रपान सोडणे, निरोगी आहार घेणे, अँटिऑक्सिडंट्स फळे आणि भाज्या खाव्यात, प्रखर उन्हात यूव्ही ब्लॉकिंग सनग्लासेस घालणे गरजेचे आहे.

– डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे)